Investigation underway into 'that' abortion case; Assistant Deputy Director visits rural hospital
मानवत, पुढारी वृत्तसेवा: शहरातील एका खाजगी रुग्णालयाच्या शौचालयात सापडलेल्या ५ महिन्यांच्या मृत अर्भक प्रकरणाची चौकशी आरोग्य विभागाकडून सुरू झाली. शुक्रवारी (दि. २५) सहायक संचालक यांनी येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन पाहणी करत माहिती घेतली.
येथील एका खाजगी रुग्णालयात ५ महिन्याचा गर्भ असलेली ३२ वर्षीय माता ही २० जुलैला सकाळी १० वाजता पोट दुखत असल्याने उपचारासाठी आली. त्या अवस्थेत ती शौचालयात गेली व तेथे गर्भपात होऊन अर्भक शौचालयात पडले. नंतर सदर महिलेने खाजगी रुग्णलायतून पोबारा केला. याच दिवशी त्या महिलेचा हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून शोध घेतल्यानंतर हे अर्भक आपलेच असल्याचे तिने सांगितले.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. यानंतर पोलिसांनी प्रकरणातील महिला व अर्भकास ताब्यात घेत ग्रामीण रुग्णायात गेले. अर्भक व मातेची तपासणी करून अहवाल मागविला असता रुग्णलयाने अर्भकास परभणी येथील शासकीय रुग्णालयात पाठविले व तेथे अर्भकाची तपासणी करून शवविच्छेदन केले असून याचा अहवाल आलेला नाही. दि. २४ जुलै रोजी ग्रामीण रुग्णालयाचे एक पथक त्या खाजगी रुग्णालयात व दुसरे पथक महिलेच्या घरी दाखल झाले.
या अनुषंगाने दि. २५ जुलै रोजी सहाय्यक उपसंचालक डॉ. दयानंद मोतीपवळे यांनी मानवतला भेट दिली. दि. २४ जुलैला वैद्यकीय अधीक्षक डॉ. शेख आशेक हुसेन व सहकाऱ्यां त्या खाजगी रुग्णालयाची झाडाझडती घेतली. तसेच उपसंचालक डॉ. कांचन वानरे व सहाय्यक उपसंचालक डॉ. मोतीपवळे हे परभणी दौऱ्यावर आले होते. यातील उपसंचालक डॉ. वानरे यांनी परभणीच्या सर्व आरोग्य संस्थांच्या प्रमुखांची बैठक परभणीत घेतली. डॉ. मोतीपवळे यांनी मानवत ग्रामीण रुग्णालयात प्रकरणाचा आढावा घेतला. सर्व पाहणीनंतर या प्रकरणात राज्याचे पीसीपीएनडीटीचे पथक येऊन सर्व ठिकाणांची तपासणी करून माहिती घेत कारवाई करतील असे सांगण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. असेफ हुसेन शेख, रुग्ण कल्याण समिती सदस्य संजय नाईक, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुराधा गोरे, डॉ. प्रफुल्ल जाधव, अधिपरिसेविका शिला पाटील, शुभांगी जोशी, योगिता मेहत्रे, औषध निर्माण अधिकारी मिनाक्षी कदम आदी उपस्थित होते.