Inconvenience to devotees in the Bhogao (Devi) temple area
गुणीरत्न वाकोडे
जिंतूर : तालुक्यातील पंचक्रोशीतील श्रध्दास्थान म्हणून ओळखले जाणारे भोगाव (देवी) मंदिर नवरात्रोत्सवात हजारो भाविकांचे पावले वळतात. मात्र मंदिर परिसरात मूलभूत सुविधा नसल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय झाल्याचे यावर्षी पहावयास मिळाले. यामुळे भक्तांसाठी श्रध्दास्थान मात्र सुविधांसाठी वानवा जाणवल्याचे बोलले होत होते.
विशेषतः महिला व वयोवृध्द भक्तांना त्रास सहन करावा लागला असून, मंदिर समिती व प्रशासनाने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे बनले होते. मंदिराच्या मागील बाजूस भक्तांच्या फेऱ्यांसाठी जाणाऱ्या मार्गावर टोकदार गिट्टी टाकण्यात आली होती. अनेक भक्त देवीच्या दर्शनासाठी अनवाणी पायाने येत होते. दर्शनानंतर बाहेर पडताना या गिट्टीवरून चालताना पायाला इजा होण्याचे प्रकार घडल्याचे दिसले.
काहींना रक्तस्रावही झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मंदिर परिसरात पावसामुळे साचलेल्या चिखलामुळे अलीकडेच एका वयस्कर भाविकाचा पाय घसरून फॅक्चर झाला होता. ही घटना गंभीर असून भविष्यात अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी रस्ता दुरुस्ती व साफसफाई करणे अत्यावश्यक बनले आहे. गर्दी नियंत्रणासाठी मंदिर परिसरात पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.
मात्र काही महिला पोलिस कर्मचाऱ्यांकडून भक्तांसोबत उध्दट वर्तन केल्याचे चित्र पहायला मिळाले. पळा, दर्शनाची वेळ संपली असे ओरडत काही महिला पोलिसांनी भक्तांना पळविले होते, यामुळे वयोवृध्द महिला धावता धावता पडता पडता वाचल्याचे बोलले जात आहे. तसेच मंदिर समितीच्या वतीने नियुक्त केलेले व्हॉलंटिअर तरुण काठीचा वापर करत भक्तांना ढकलत असल्याचेही निदर्शनास आले. भाविकांत यामुळे नाराजी पसरली होती. मुख्य रस्त्यालगत दुचाकी वाहनांसाठी २० रुपयांचे शुल्क आकारले गेले तरी तेथे कोणत्याही पार्किंग सुविधा उपलब्ध नव्हत्या. सावली, सुरक्षा किंवा वाहनांच्या रचनेचा अभाव होता, केवळ आर्थिक भुर्दंड लादला जात असल्याची भावना भक्तांत होती.
भोगाव (देवी) हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले असले तरी प्रत्यक्षात कोणतीही सुविधा येथे उपलब्ध नाही. तलाव, बोटिंग यासारख्या संकल्पना केवळ कागदावरच मर्यादित राहिल्या आहेत. एक मूल तीस झाड या संकल्पनेतून येथे झाडे लावण्यात आली होती, मात्र देखभालीअभावी त्याचेही चित्र निराशाजनक बनलेले आहे.
मंदिर समितीने दर्शन मार्ग, स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती तसेच पोलिस आणि स्वयंसेवकांचे वर्तन याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देणे गरजेचे होते. शासनाच्या पर्यटन विभागानेही येथील पायाभूत सुविधा व विकासासाठी व्यवस्थात्मक हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा आर्वी (कुंभारी) येथील भक्त रामप्रसाद भालेराव यांनी व्यक्त केली आहे.