

Parbhani soybean crop was destroyed
पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सहाही महसूल मंडळात सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर अनेकदा ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस पडून अतिवृष्टी झाली. या नैसर्गिक आपत्तीत अभाळ फाटल्याने नदी, नाल्यांना मोठे पूर आल्याने शेतशिवारं खरडून गेली. खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
अतिवृष्टी झाल्यानंतर चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. सातत्याने अतिवृष्टीत पिचलेल्या सोयाबीन पिकांची अवस्था दयनीय दिसत असून हातातोंडाशी आलेला घास निसगनि हिरावून घेतला आहे. शासन संपूर्ण वाया गेलेल्या पिकापोटी अतिशय तुटपुंजे अनुदान माथी मारत आहे. प्रति गुंठा ८५ रुपये अनुदानातून शेतकऱ्यांचे भागेल काय ? असे नानाविध सवाल शेतकऱ्यांपुढे आ वासून उभे ठाकले आहेत. सध्या शंभर टक्के पिकं बाधित झाली असता केवळ ४० ते ६० टक्केच क्षेत्र बाधित गृहित धरून महसूल विभागाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
स्थानिक महसूल खात्याकडून अनुदान रकम प्रदान करण्यासाठी बाधित शेतकऱ्यांच्या याद्या अपडेट्स करण्याचे काम चालू आहे. काही ठिकाणी ईकेवायसी करण्याकरिता विशिष्ट क्रमांकासह याद्या प्रसारित केल्या जात आहेत. परंतु, दिल्या जाणाऱ्या याद्यांव्दारे अनुदान रक्कम मात्र अतिशय कमी येत असल्यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे. अनुदान असे दिले जात आहे की ते बँकेत जाऊन उचलायलाही परवडनासे झाले आहे. अतिवृष्टीमुळे संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला त्या तुलनेत अनुदान काहीच नाही. सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा मांडली असल्याचे यावरून दिसून येत आहे.
अतिशय तोकड्या अनुदान रकमेमुळे ठिकठिकाणी शेतकरी शासनाचा धिक्कार करत असून असे अनुदान आम्हाला नकोच म्हणून सांगताहेत. पावसाच्या उघडीपीनंतर शेतात जाऊन सोयाबीन पिकाकडे पाहिले असता ते कापणी करायलासुध्दा उरले नसल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण काळेभोर पडून जागेवरच झिरपले आहे. अशा भयानक परिस्थितीत शेतकऱ्यांनी आता करायचे काय ? कसा घरसंसर खर्च चालवावा ? मुलाबाळांचे शिक्षण, दवाखाना खर्च, दिवाळी कसौ साजरी करायची ? असे प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. डोळ्यासमोर घरसंसार लेकरं दिसताहेत. त्यांना जगवण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शासनाच्या कवडीमोल अनुदानातून काय होणार आहे ? देवानं दिलेलं सरनां अन् माणसानं दिलेलं पुरनां असी भयाण अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.