Parbhani News : दुष्काळात विहिरींच्या वायर चोरीचा धुमाकूळ  file photo
परभणी

Parbhani News : दुष्काळात विहिरींच्या वायर चोरीचा धुमाकूळ

रब्बी पेरणी संकटात, रत्नापूर परिसरात चोरट्यांची दहशत, पोलिसांकडून गस्तीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Incidents of well-pump wire theft uncovered during drought

रत्नापूर, पुढारी वृत्तसेवा : पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाशी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता विहिरी आणि बोअरवेलच्या वायर चोरीचे नवे संकट उभे राहिले आहे. रत्नापूर आणि दुधाळवाडी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींच्या आणि बोअरवेलच्या वायर लंपास केल्या आहेत.

मागील तीन महिन्यांतील चोरीची ही पाचवी घटना असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वारंवार तक्रारी करूनही चोऱ्या थांबत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पावसाअभावी खरीप पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकरी उपलब्ध पाण्यावर रब्बी पेरणीची तयारी करत आहेत. मात्र, पाणी उपसण्यासाठी आवश्यक वायरच चोरीला गेल्याने पाणी असूनही सिंचन कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हजारो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. वायर चोरीची तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर खरेदीची पावती मागितली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

अनेकांकडे जुन्या वायरच्या पावत्या नसल्याने तक्रार नोंदविताना अडचणी येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुधाळवाडी येथील अरुण अनंता भांगे यांनी २ ऑक्टोबर रोजी अर्ज दिला होता. तरीही चोऱ्या सुरूच असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

चोरीला गेलेल्या वायर कोणाच्या ?

रत्नापूर येथील अच्युत विठ्ठल जाधवर, भाऊसाहेब रावसाहेब जाधवर, शाहू अनंता युवराज जाधवर, हनुमंत जाधवर, अशोक उत्तरेश्वर जाधवर आणि दीपक टेकाळे यांच्या शेतातील वायर चोरीला गेल्या. दुधाळवाडीतील रामभाऊ जाधवर, मोहन उत्तम भांगे, कुंडलिक गोविंद भांगे, वैजनाथ आनंदा भांगे आणि अरुण अनंता भांगे यांच्याही विहिरी व बोअरवेलच्या वायर लंपास झाल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT