

Purna Taluka News
पूर्णा : तालुक्यातील गौर येथे पावसाचे वाहून जाणारे पाणी शेतातच अडवून जमिनीत मुरविण्याच्या उद्देशाने जलतारा या अभिनव उपक्रमाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. भूजलपातळी वाढविणे, जमिनीतील ओलावा टिकविणे आणि पाणीटंचाईवर मात करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या योजनेमुळे गौर गाव जलसमृद्धीच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण मिसाळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा कटारे, सोनवणे, मुनेश्वर, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी श्रीधर पारवे, पंचायत समिती सदस्य रमेश सूर्यवंशी, नरेश जोगदंड, ग्रामसेवक ए. आर. लाडेकर, रोजगार सेवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गटविकास अधिकारी मिसाळ यांनी जलतारा योजनेची माहिती दिली. या उपक्रमांतर्गत प्रत्येक शेतात साधारण पाच फूट लांबी व रुंदी आणि सहा फूट खोलीचा खड्डा तयार करून त्यात मोठे दगड भरले जातात. पावसाचे वाहून जाणारे पाणी या खड्ड्यात जमा होऊन हळूहळू जमिनीत मुरते. त्यामुळे भूजलपातळी वाढण्यास मदत होते, तसेच जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. परिणामी, पावसाळ्यानंतरही पिकांना पाणी उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते.
सध्या कोरड्या दुष्काळामुळे अनेक भागांतील भूजलपातळी खालावली असून विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीवरही परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत जलतारा हा कमी खर्चातील जलसंधारणाचा उपाय ठरू शकतो. शासनाकडून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरी आणि साहित्यासाठी अनुदान दिले जात असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
कृष्णा कटारे यांनी गावातील प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात किमान एक जलतारा तयार करण्याचे आवाहन केले. सामूहिक प्रयत्नांतून भूजलपातळी वाढविणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. गौर ग्रामपंचायतीने सुरू केलेला हा उपक्रम तालुक्यासाठी दिशादर्शक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून शेतकऱ्यांकडूनही या योजनेला प्रतिसाद मिळत आहे.