Parbhani Heavy Rains : नऊ महसूल मंडळांत अतिवृष्टी, खरीप पिकांना फटका  File Photo
परभणी

Parbhani Heavy Rains : नऊ महसूल मंडळांत अतिवृष्टी, खरीप पिकांना फटका

नदी-नाले तुडुंब, पिके बुडाली पाण्यात

पुढारी वृत्तसेवा

Heavy rains in nine revenue circles, Kharif crops hit

परभणी, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्याला पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झोडपून काढले. या अवकाळी मुसंडीने जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली, उभ्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

जिल्ह्यातील अनेक भागांत नद्या-नाल्यांना पूर आल्याने सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. काही ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान अनियंत्रित स्वरूपाचे बनले आहे. शनिवारी (दि.१३) अतिवृष्टीने परभणी तालुक्यातील सिंगणापूर मंडळात ६५.५ मिमी, पिंगळी ९५ मिमी, परभणी ग्रामीण ९५ मिमी, पूर्णा तालुक्यातील पूर्णा १३९ मिमी, ताडकळस ९६.३ मिमी, कात् नेश्वर १४७.५ मिमी, पालम तालुक्यात पालम ७९.८ मिमी, बनवस ७५.८ मिमी तर पेठशिवणी मंडळात ८९.३ मिमीची नोंद झाली. या पावसामुळे सोयाबीन, तूर यासारख्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही ठिकाणी पिके आडवी पडली असून काही ठिकाणी पाणी साचून मुळे कुजण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

ताडकळसला नदी-नाले तुडूंब

ताडकळस ताडकळससह परिसरात एक महिन्यापासून पाऊस दररोज हजेरी लावून धुवांधार कोसळत आहे, दोन दिवसांपासून कहर केला. या परिसरात अति मुसळधार पाऊस होत असल्याने नदीनाले तुडुंब भरून शेतात पाणी जावून हाताशी आलेले उभे पिके पाण्याखाली गेले. गुरुवारी (दि.११) सकाळी १० वाजता दोन तास धो धो पाऊस झाला तर शुक्रवारी सायंकाळपर्यंत मुसळधार पाऊस झाल्याने नदीनाले तुडुंब भरून अनेक भागातील शेतात पाणी शिरून हातातोंडाशी आलेले उभे पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट आले. मुसळधार पावसामुळे ताडकळस मंडळात पिकांच्या वाढीला अडथळा होत असून संपूर्ण पिके पिवळे होऊन मोठे नुकसान होत पाण्याखाली जाऊन जमिनी पिकासह खरडून जात आहेत. शासनाने सरसकट पंचनामे करून मदत देण्याची मागणी होत आहे.

पाथरीत पाऊस

पाथरी : शनिवारी (दि.१३) साडेअकरा वाजता शहरासह तालुक्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. यामुळे शेतकऱ्यांची शेतमशागत कामे खोळंबली. यावर्षी तालुक्यातील खरिपा पेरण्या मृग नक्षत्रात झाल्या नाही. तब्बल महिनाभर उशीर झाला. अवेळी पेरण्यानंतर कुठे अवकाळी तालुक्यात पडला. नंतर पिकांना हवा तेवढा पाऊस पडल्यामुळे तालुक्यातील पिकांची परिस्थिती बऱ्यापैकी आहे. तालुक्यातील कासापुरी, हदगाव या दोन्ही मंडळात टप्प्याटप्प्याने अतिवृष्टी झाली. तसेच इतर महसूल मंडळात नाईक पाऊस न पडल्यामुळे पिकांची जेमतेम परिस्थिती आहे.

अतिवृष्टीग्रस्त शिवारांना आ. पाटलांची भेट

परभणी : तालुक्यात शुक्रवारी अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापसासह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले. आ. डॉ. राहुल पाटील यांनी शनिवारी पिंगळी, मिरखेल शिवारातील बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. नंतर त्यांनी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांची भेट घेत नुकसानग्रस्त पिकांचे नमुने सादर करत, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यातही दोनदा अतिवृष्टी झाली होती. पुन्हा शुक्रवारी पावसामुळे अनेक मंडळांत शेतजमिनी पाण्याखाली गेल्या. आ.डॉ. पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्यासह दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी या नुकसानीची तातडीने दखल घेत पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले. यावेळी तहसीलदार संदीप राजपुरे, तालुका कृषी अधिकारी नांदे, कृषी सहाय्यक देशमुख, बाजार समिती संचालक अरविंद देशमुख, माजी जि.प. सदस्य दिनेश बोबडे, संदीप झाडे, बंडू नाना बिडकर, सरपंच अंगदराव गरुड, बाळासाहेब गरुड, जगनलाला गरुड, रामा कदम, गंगाधर गाडगे, हनुमान कदम, नागनाथ देशमुख, सुभाष कदम, गोकुळ पावडे, उमेश देशमुख, शरद देशमुख, संभाजी लोखंडे, जनार्धन कदम, उध्दव गरुड, काशिनाथ गरुड, मुंजाजी डुबे, संबंधित गावातील तलाठी, कृषी सहाय्यक व शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT