

Soybean Crop Loss Parbhani
पूर्णा : तालुक्यात शुक्रवारी (दि. १२) झालेल्या ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरून मोठा पूर आला. या पुराचा फटका पांगरा गावालाही बसला. गावाजवळील नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने शेतात घुसून रस्ते व पिके खरडून नेली.
वेगाने वाहणाऱ्या पाण्याने नदीकाठच्या शेतांतील सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. तुकाराम ढोणे, विठ्ठल केरबाजी ढोणे, नरहरी ढोणे, पंडित ढोणे, कुंडलिक ढोणे, मनोहर ढोणे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे जवळपास दहा एकर सोयाबीन पीक वाहून गेले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.पुरामुळे जिल्हा परिषद शाळेलाही वेढा बसला. संध्याकाळी पाच वाजता सुट्टी झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना बराच वेळ वर्गातच थांबावे लागले.
याचबरोबर पांगरा, तरंगल, वाई, पिंपळा लोखंडे, लोणधार, हिवरा, सोनखेड, रेगाव, धोतरा, चुडावा, कावलगाव परिसरातील नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. चुडावा महसूल मंडळात यंदा चौथ्यांदा अतिवृष्टीची नोंद झाली असून खरीप हंगाम जवळपास पूर्णतः फसल्याची स्थिती आहे. शेतकरी वर्गाने शासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.