

सोनपेठ : तालुक्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. दरम्यान पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाचे आपत्कालीन ९ दरवाजे आडीच फुटाणे उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदीच्या पात्रात ४ हजार ७१६ क्युसेस व इतर सांडव्याद्वारे असे एकूण ९९ हजार ३६ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सोनपेठ तालुक्यात सलग तीन दिवसांपासून मुसळधार व संततधार पाऊस पडत आहे. अधूनमधून पावसाच्या सरींवर सरी सुरूच आहेत. त्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली असल्याने जायकवाडी धरणातुन पाणी सोडण्यात आले आहे. रविवारी (दि.१४) पहाटे ५:०० ते ५:१५ च्या सुमारास जायकवाडी धरणाचे आपत्कालीन ९ दरवाजे ०.५ फूट उचलून २.५ फूट पर्यंत उघडण्यात आले आहेत.
गोदावरी नदी पात्रात ४ हजार ७१६ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच इतर सांडव्याद्वारे नदी पात्रात एकुण १८ नियमित व ९ आपत्कालीन दरवाजे उघडून ९४ हजार ३२० क्युसेस असे एकूण ९९ हजार ०३३ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जायकवाडी धरण क्षेत्राच्या भागात पावसाचे पाणी व पाण्याची आवक लक्षात घेऊन पाण्याच्या विसर्गात वाढ किंवा घट करण्यात येईल. त्यामुळे सोनपेठ तालुक्यातील नदीकाठच्या गावांना तालुका प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात दिला आहे. नदीकाठावरील जनावरे, शेती साहित्य, अवजारे, सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे असे आवाहन देखील तालुका प्रशासनाने केले आहे.