हट्टा – हट्टा ते आडगाव दरम्यान दर्शन बारजवळ रात्री साडेआठच्या सुमारास हट्टावरून बोरी सावंतकडे जाणाऱ्या दुचाकीला झिरो फाट्याकडून हिंगोलीकडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार (एमएच 06 बीव्ही 1973) ने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर कारने दुचाकीला तब्बल 200 मीटरपर्यंत फरफरत नेत पुढे उसाच्या ट्रॅक्टरला धडक दिली.
दुचाकीवरील जखमी तरुणाला 108 ॲम्बुलन्सद्वारे डॉक्टर कपिल शिंदे आणि चालक जोंधळे यांनी परभणीला हलवले. घटनास्थळी हट्टा पोलिसाचे कासले यांनी वाहतूक सुरळीत केली. अपघातात जखमी झालेल्या अरुण सुनील सुर्वे (20) याचा परभणीहून नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
तर ओंकार गणपत बाराहाते (20, रा. हट्टा) यांचा परभणी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. किशोर धोंडीबा साव (20, रा. बोरी सावंत) हे गंभीर असून त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत. सदरील तिघेही परभणी येथील महाविद्यालयात डी. फार्मसीचे शिक्षण घेत होते. त्यांनी हट्टा येथे येऊन पोलीस भरतीसाठी ऑनलाइन फॉर्म भरला होता. रात्री उशीर झाल्याने बोरी सावंत येथील मित्राला दुचाकीवरून सोडण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. तिघेही जिवलग मित्र होते.
अपघातानंतर कारचालकाने दुचाकी दूरपर्यंत फरफरत नेत उसाच्या ट्रॅक्टरला धडक दिली आणि नंतर गाडी सोडून पळ काढला. हट्टा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
एका मित्राला मुखाग्नी दिल्यानंतर त्याच वाटेने दुसऱ्या मित्राचे प्रेत नेले जात असल्याचे हृदयद्रावक दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले. हट्टा गावातील दोन तरुणांचे निधन झाल्याने गावात शोककळा पसरली असून बोरी सावंत येथील किशोर हे गंभीर जखमी आहेत व त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत.