सोनपेठ : तालुक्यातील गोळेगाव येथे स्व-जनगणना लाभार्थ्यांसमवेत नायब तहसीलदार ज्ञानेश्वर धोंगडे, पर्यवेक्षक व प्रगणक. pudhari photo
परभणी

Maharashtra Census Campaign : गोळेगावात 100 टक्के स्व-जनगणना, तालुक्यात अव्वल

जनसहभागामुळे गावाने घडविला आदर्श ; प्रशासनाच्या नियोजनबद्ध मोहिमेस मोठा प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

सोनपेठ ः तालुक्यातील गोळेगाव गावाने स्व-जनगणना मोहिमेत अभूतपूर्व यश मिळवत 100 टक्के कामगिरी पूर्ण केली असून, तालुक्यातील पहिलं गाव म्हणून मानाचा तुरा मिळवला आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे आणि प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे गोळेगावने एक आदर्श निर्माण केला अशी माहिती तहसीलदार सुनील कावरखे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या आदेशानुसार आणि तहसीलदार सुनील कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनपेठ तालुक्यात दि.1 ते 15 मे या कालावधीत स्व-जनगणना मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली आहे. शासनाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाला गावपातळीवर व्यापक जनजागृतीची जोड देण्यात आली होती, ज्यामुळे मोहिमेला मोठया प्रमाणात नागरीकांचा प्रतिसाद मिळाला.

ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेत, कोणतीही अडचण न येता संपूर्ण माहिती वेळेत उपलब्ध करून देत 100 टक्के स्व-जनगणना पूर्ण केली आहे. या स्व-जनगणनेच्या शंभर टक्के यशामुळे गोळेगावने संपूर्ण तालुक्यात एक आदर्श निर्माण करत पहिला क्रमांक मिळवला. दि.15 मे ते 14 जून या कालावधीत घर गणना मोहीम राबविण्यात येणार असून, त्यासाठी प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

नागरिकांनी या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सुनील कावरखे यांनी केले आहे. या मोहिमेच्या यशामध्ये नायब तहसीलदार ज्ञानेश्वर धोंगडे, पर्यवेक्षक संतोष म्हेत्रे, ग्राम महसूल अधिकारी बालाजी नागदे, तांत्रिक सहाय्यक सईद शेख, संभाजी धोंडगे, ईश्वर मुलगीर यांचा समन्वय निर्णायक ठरला. त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली आहे. गोळेगाव गावाचा आदर्श तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरला. जनसहभागातून प्रशासनिक यश याचे उत्तम उदाहरण म्हणून या गावाची नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT