

गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनलगत असलेल्या गोरेगाव तालुक्यात रविवारी सकाळी रानगव्याने केलेल्या भीषण हल्ल्यात एका शेतकऱ्याचा करुण अंत झाला. रानगव्याने थेट पोटात शिंगे खुपसल्याने ५७ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे सावट पसरले असून वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नीलकंठ नंदलाल तुरकर (वय ५७, रा. सोनेगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. रविवारी, ४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नीलकंठ नेहमीप्रमाणे आपल्या घरातून शेताकडे जाण्यासाठी निघाले होते. गावातील चौकात काही वेळ थांबून गप्पा मारल्यानंतर ते सोनेगाव-शहारवाणी मार्गावरील आपल्या शेताकडे चालू लागले. दरम्यान, जंगलातून भरकटलेला एक विशाल रानगवा अचानक त्यांच्या समोर आला. काही कळण्याच्या आतच या हिंस्त्र रानगव्याने नीलकंठ यांच्यावर हल्ला चढवला आणि त्यांच्या पोटाचा वेध घेत शिंगे खुपसली. हा हल्ला इतका भीषण होता की, रक्तबंबाळ अवस्थेत नीलकंठ यांचा घटनास्थळीच श्वास तुटला.
हल्ल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच संतप्त गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आरडाओरड करून गावकऱ्यांनी रानगव्याला तिथून पिटाळून लावले. मात्र, हा भरकटलेला रानगवा एवढ्यावरच थांबला नाही. सोनेगाव येथून पळाल्यानंतर त्याने कवलेवाडा आणि चिचगावटोला परिसरात शिरकाव केला. तिथल्या स्थानिक नागरिकांनीही जीवाची पर्वा न करता या रानगव्याला हुसकावून लावले. सध्या हा रानगवा नेमका कुठे आहे, याबाबत संभ्रम असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे प्रचंड वातावरण आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या सीमावर्ती भागात वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे. आजच्या या घटनेनंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, "मृतक शेतकऱ्याच्या कुटुंबाला तात्काळ मदत मिळावी आणि या हिंस्त्र रानगव्याचा बंदोबस्त करावा," अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, शेतात जाणेही आता जीवावर बेतत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.