Ratnagiri News
शेवग्याच्या शेंगा ग्रामीण कुटुंबांना आधार

Ratnagiri News : शेवग्याच्या शेंगा ग्रामीण कुटुंबांना आधार

दापोलीत मागणी वाढली; पारंपरिक पद्धतीने केली जातेय शेवग्याची शेती
Published on

दापोली : दापोली तालुक्यात विशेषतः ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने उगवलेला शेवगा आजही अनेक घरांच्या अंगणात आणि शेतांच्या कडेला दिमाखात उभा आहे. या झाडांवरील शेवग्याच्या शेंगा स्थानिक बाजारपेठेत विकल्या जात असून अनेक कुटुंबांना त्यातून आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला आहे.

तालुक्यात शेवग्याची व्यापारी स्वरूपातील मोठ्या प्रमाणावर लागवड फारशी दिसून येत नसली, तरी पारंपरिकरित्या उगवलेल्या झाडांवरील शेंगांची विक्री मात्र चांगली होते. दापोली शहरात शेवग्याच्या शेंगांना कायम मागणी असते. विशेषतः हंगामात दर गगनाला भिडताना दिसतात. गावठी शेंगांची चव आणि ताजेपणा यामुळे ग्राहक त्यांना विशेष पसंती देतात.अनेक वेळा स्थानिक उत्पादन अपुरे पडत असल्याने बाहेरील भागातून शेंगा विक्रीसाठी आणाव्या लागतात. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांसाठी शेवग्याची व्यावसायिक लागवड करण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. कमी खर्चात आणि कमी पाण्यात येणारे पीक म्हणून शेवगा ओळखला जातो. योग्य नियोजन केल्यास वर्षातून अनेक वेळा उत्पादन मिळू शकते.

कृषी तज्ज्ञांच्या मते, दापोली तालुक्यातील हवामान शेवग्यासाठी पोषक आहे. नियोजनबद्ध लागवड केल्यास स्थानिक बाजारपेठेबरोबरच इतर शहरांतही विक्रीची संधी निर्माण होऊ शकते. पौष्टिक मूल्यांमुळे शेवग्याच्या शेंगांना ग्राहकांकडून मोठी मागणी असते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीपलीकडे जाऊन व्यापारी दृष्टिकोनातून लागवड केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास निश्चितच मदत होईल. एकूणच दापोली तालुक्यात शेवग्याच्या शेंगांमधून ग्रामीण अर्थचक्राला चालना मिळत असून योग्य नियोजन केल्यास हे पीक स्थानिक शेतकऱ्यांसाठी ‌‘हरित सोनं‌’ ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news