G-7 Sugar files case against Nirani Sugar for fraud
गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील माखणी येथील जी-७शुगर लिमिटेड (माजी गंगाखेड शुगर अँड एनर्जी लि.) या कंपनीला तब्बल १ कोटी २१ लाख ५८ हजार ८०८ रुपयांची फसवणूक झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली. याप्रकरणी कर्नाटकातील निराणी शुगर कंपनीच्या दोन वरिष्ठ संचालकांविरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जी-७ शुगर कंपनीचे जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे यांनी याबाबत गंगाखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये त्यांनी २०२२-२३ गळीत हंगामासाठी करण्यात आलेल्या एका व्यावसायिक कराराच्या उल्लंघनाचा आणि आर्थिक फसवणुकीचा आरोप केलेला आहे. या तक्रारीनुसार, दि.१० फेब्रुवारी २०२३ रोजी कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ येथील निराणी शुगर कंपनीने जी-७ शुगरसोबत लेखी करार केला होता.
करारानुसार निराणी शुगरने गळीत हंगामासाठी १०० वाहने आणि २ हजार ऊसतोड कामगार उपलब्ध करून देण्याचे मान्य केले होते. या करारावर कंपनीचे कार्यकारी संचालक संगमेश आर. निराणी आणि संचालक (ऊस) नृसिंह वैजूभैय्या पडियार यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
करारानुसार, जी-७ शुगर कंपनीने दि.१६ फेब्रुवारी २०२३ रोजी इको बँकेच्या नागपूर शाखेतून ऑनलाईन पध्दतीने १ कोटी २१ लाख ५८ हजार ८०८ इतकी ठरलेली रक्कम निराणी शुगरच्या खात्यात जमा केली होती. मात्र ही रक्कम मिळाल्यानंतरही निराणी शुगरकडून करारातील अटींचे पालन करण्यात आले नाही.
ना वाहने उपलब्ध करून देण्यात आली, ना ऊसतोड कामगार. परिणामी जी-७शु-गरला मोठा आर्थिक फटका बसला. तक्रारदारांच्या मते, निराणी शुगरच्या संचालकांनी जाणीवपूर्वक खोटा करार केला आणि त्याच्या अंमलबजावणीत दुर्लक्ष करून कंपनीचा विश्वासघात केला. त्यामुळे हे प्रकरण केवळ व्यावसायिक अडथळ्यापुरते न राहता सरळसरळ फसवणुकीचे असल्याचे जी-७ शुगरने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. सदर प्रकरणी गंगाखेड पोलिसांनी भारतीय दंड विधानातील संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंद केला.