

Truck's steering rod broke due to potholes
गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील महाराणा प्रताप चौक ते बसस्थानक या मुख्य मार्गावरील मोठ्या खड्ड्यांमुळे अखेर एक मालवाहू ट्रकचा स्टिअरिंग रॉड तुटल्याची घटना शनिवारी (दि.५) घडली, सुदैवाने वेग कमी असल्यामुळे मोठा अपघात टळला. मात्र या घटनेमुळे शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
धुळे येथून नांदेड जिल्ह्यातील लोहा गावाकडे जाणार्या मालवाहू ट्रकचा अपघात येथील उपजिल्हा रुग्णालयाजवळील रस्त्यावर घडला. ट्रक रस्त्यावरच अडकून पडल्याने चालकाला दिवसभर जागेवरच तांत्रिक दुरुस्ती करावी लागली. खड्डयांमुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले असून ही स्थिती गंभीर असल्याचे चालकांनी सांगितले.
महाराणा प्रताप चौक ते बसस्थानक दरम्यानचा रस्ता हा प्रस्तावित उड्डाणपुल कामासाठी सार्वजनिक बांधकामकडे वर्ग करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात ना महामार्ग प्राधिकरण, ना सार्वजनिक बांधकाम विभाग यापैकी कोणीही रस्त्याच्या देखभालीसाठी पुढाकार घेत नाही. परिणामी रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. गंगाखेड येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागही फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. खड्ड्यांची दुरुस्ती वेळेत होत नसल्यामुळे वाहनांचे नुकसान व अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
विशेषतः बाहेरगावच्या वाहनांसाठी हा रस्ता धोकादायक सापळा ठरत आहे. मात्र स्थानिक नागरिक व वाहनचालकांच्या म्हणण्यानुसार ही केवळ तात्पुरती डागडुगी असून पावसाचे पहिले दोन थेंब पडले की पुन्हा रस्ता जैसे थे होवू शकतो. यामुळे कायमस्वरूपी मजबुतीकरण करण्याची मागणी जोर धरीत आहे.
मनसेचे राज्य उपाध्यक्ष बालाजी मुडे यांनी या परिस्थितीवर संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिलेला होता. यानंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेत उपाययोजनांसाठी हालचाली सुरू करून शनिवारी (दि.५) दुपारी २ वाजता रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले.