Diwali gift to students of farmers affected by heavy rains
परभणी, पुढारी वृत्तसेवा मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीसह शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याचा फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणा वरही बसला. अशा संकटग्रस्त विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी नाशिकच्या पंचवटी येथील लोकनेते व्यंकटराव हिरे (स्वायत्त) महाविद्यालयाने पुढाकार घेत येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील अतिवृष्टीग्रस्त १५० विद्यार्थ्यांना दिवाळी भेट दिली.
राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आवाहनानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. डॉ. योगिता हिरे यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी मदत निधी गोळा केला. यातून विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ हजार रोख, शालेय बॅग, सहा नोटबुक, किराणा सामान आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
शनिवारी (दि.१८) श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात हा वितरण सोहळा पार पडला. यावेळी प्राचार्य डॉ.बी.एस. जगदाळे, डॉ. बाळासाहेब जाधव, डॉ. प्रकाश शेवाळे, डॉ. श्रीनिवास केशेट्टी, डॉ. जयंत बोबडे, डॉ. तुकाराम फिसफिसे, संदीप मारके, डॉ. भूषण चकोर आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. जगदाळे म्हणाले, विद्यार्थ्यांचे मानसिक बळ वाढविण्यासाठी हिरे महाविद्यालयाच्या माध्यमातून दिवाळीच्या काळात मदतीचा हात देण्यात आला.
तर डॉ. बाळासाहेब जाधव म्हणाले, ही मदत विद्यार्थ्यांसाठी उभारी देणारी असून आमच्या महाविद्यालयाला मिळालेला हा पाठिंबा महत्वाचा आहे. सूत्रसंचलन डॉ. तुकाराम फिसफिसे तर आभार डॉ. जयंत बोबडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी रवी कावळे, सुरेश पेदापल्ली, अशोक कलंबरकर, सय्यद सादिक, साहेब येलेवाड, दिलीप निर्वळ, गणेश गरड, अमित बीडला, सागर खुणे, बापूराव कदम आदींनी परिश्रम घेतले.