Crime News  pudhari
परभणी

Parbhani Crime : भर दिवसा घर फोडून चार लाखांची रोकड लंपास

रामकृष्ण नगरातील मेडिकल व्यापाऱ्याच्या घरात चोरी; पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

परभणी : शहरातील रामकृष्ण नगर परिसरात भरदिवसा घडलेल्या धाडसी घरफोडीच्या घटनेने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याची संधी साधत मेडिकल होलसेल व्यापाऱ्याच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेली तब्बल 4 लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर आणि सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर रामप्रसाद झंवर हे रामकृष्ण नगर येथे वास्तव्यास असून मेडिकल होलसेल व्यवसाय करतात. शुक्रवारी (दि.29) सकाळी सुमारे 9.45 वाजण्याच्या सुमारास ते कामानिमित्त घराबाहेर गेले होते. याच काळात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरावर पाळत ठेवून घर बंद असल्याची खात्री केली आणि घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी घरातील कपाट उघडून त्यामध्ये ठेवलेली मोठी रोख रक्कम लंपास केली. चोरीस गेलेल्या रकमेमध्ये 500 रुपयांच्या 600 नोटा म्हणजे 3 लाख रुपये आणि 100 रुपयांच्या 1 हजार नोटा म्हणजे 1 लाख रुपये, असा एकूण 4 लाख रुपयांचा ऐवज असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संध्याकाळी घरी परतल्यानंतर झंवर यांच्या निदर्शनास घराचे कुलूप तुटलेले असल्याचे आले.

घरात प्रवेश केल्यानंतर कपाटातील रोख रक्कम गायब असल्याचे लक्षात येताच त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने नवा मोंढा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम सुरू करण्यात आले असून संशयित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपासालाही वेग देण्यात आला.

घराची पूर्वरेकी करण्यात आली होती का, घरात कोणी नसल्याची माहिती आरोपींना कशी मिळाली, तसेच या चोरीमागे स्थानिक टोळीचा हात आहे का, याचाही तपास पोलीस करीत आहेत. रामकृष्ण नगरातील ही घटना केवळ एक घरफोडी नसून चोरट्यांनी पोलिस व्यवस्थेलाच दिलेले उघड आव्हान असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 व 331(3) अन्वये गुन्हा क्रमांक 347/2026 दाखल करण्यात आला आहे. सपोउपनि खुपसे यांनी गुन्हा नोंदविला असून पोलीस निरीक्षक माजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. चोरीचा छडा लावून आरोपींना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिक धास्तावले

अलीकडील काळात शहरातील विविध भागांत चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः दिवसाढवळ्या घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. भरवस्तीत आणि रहिवासी परिसरात चोरटे इतक्या सहजतेने घरफोडी करीत असल्याने नागरिकांकडून रात्रीबरोबरच दिवसा देखील गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT