Cooperative factories with excellent performance will be honored
परभणी, पुढारी वृत्तसेवा : सहकारी साखर उद्योगातील गुणवत्ता वाढविणे आणि आर्थिक सक्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व सहकारी साखर कारखानदारीच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या औचित्याने उत्कृष्ट कामगिरीतील सहकारी साखर कारखान्यांना दरवर्षी सन्मानित व प्रोत्साहित करण्याची योजना शासनाने जाहीर केली असून नऊ प्रमुख क्षेत्रांतील कामगिरीच्या आधारे गुणांकनातून ही निवड केली जाणार आहे.
सदर योजनेचा निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने शासन निर्णयाद्वारे दि.१२ नोव्हेंबर रोजी घेतला असून, साखर आयुक्तांच्या प्रस्तावावर शासनाने विचार करून ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रोत्साहन योजनेंतर्गत साखर कारखान्यांची निवड नऊ प्रमुख क्षेत्रांमधील कामगिरीच्या आधारे केली जाणार आहे. या प्रत्येक निकषाला गुणांकन प्रणाली दिली.
यात वेळेत आणि पूर्ण एफआरपी पेमेंट (१५ गुण) असून मागील तीन वर्षांत शेतकऱ्यांना १०० टक्के एफआरपी वेळेत देणारे कारखाने, कारखान्यातील इतर विभागांची कार्यक्षमता (१० गुण) यात प्रत्येक विभागासाठी २ गुण, सर्वाधिक साखर उतारा (१० गुण) मध्ये उत्कृष्ट तांत्रिक व परिचालन कार्यक्षमतेचे द्योतक, प्रति हेक्टरी ऊस उत्पादन (१० गुण) शेतकऱ्यांबरोबर ऊस उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न, कृत्रिम बुध्दिमत्तेचा (एआय) वापर व क्षेत्र कव्हरेज (१० गुण) पीक निरीक्षण, अंदाज, संसाधन व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कमी कार्बन उत्सर्जन व उच्च कार्बन क्रेडिट्स (१० गुण) पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पादन पध्दती, शासकीय कर्जाची वेळेवर परतफेड (१० गुण) आर्थिक शिस्तीचे पालन करणारा कारखाना, खर्च व लेखापरीक्षण कार्यक्षमता (५ गुण) -परिचालन कार्यक्षमता व आर्थिक व्यवस्थापन, दुरुस्ती अहवाल, कर्मचारी व वेतन अदायगी (५ गुण) - एकूण प्रशासकीय कार्यक्षमता यांचा समावेश आहे.
दोन टप्प्यांत निवड प्रक्रिया
उत्कृष्ट कारखान्यांची निवड दोन समित्यांमार्फत केली जाणार आहे यात छाननी समिती आणि निवड समितीचा समावेश आहे. यामध्ये छाननी समितीचे अध्यक्ष हे साखर आयुक्त असतील. या समितीत साखर आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे प्रतिनिधी, साखर संघाचे प्रतिनिधी आणि दोन स्वतंत्र तज्ञांचा समावेश असेल. प्रत्येक प्रादेशिक सहसंचालक हे आपल्या विभागातील ३ सहकारी व ३ खाजगी कारखान्यांची नावे या समितीकडे पाठवतील. छाननी समिती त्या आधारे ६ सहकारी व ६ खासगी कारखान्यांची निवड करून पुढील समितीकडे शिफारस करेल. यानंतर निवड समिती, ज्याचे अध्यक्ष सहकार मंत्री असतील, ती अंतिम निवड करेल. या समितीत सहकार राज्यमंत्री, सहकार प्रधान सचिव, साखर आयुक्त आणि उपसचिव (साखर) हे सदस्य असतील. निवड समिती ही ३ सर्वोत्तम सहकारी व ३ सर्वोत्तम खाजगी साखर कारखाने पारितोषिकासाठी निवडणार आहे.