Cloudburst again in Parbhani district
परभणी, पुढारी वृत्तसेवा: शहरासह जिल्ह्यात सोमवारी (दि.६) पहाटेच्या सुमारास आभाळ फाटल्यासारखा ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. अवघ्या काही तासांत सखल भाग जलमय झाले. अनेक वस्त्यांतील शेकडो घरांत पाणी घुसले. परिणामी, नागरिकांची झोपमोड होऊन मोठ्या प्रमाणात संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. जिल्ह्यातील १२ मंडळांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. पावसामुळे शिल्लक पिकेही पूर्ण पाण्यात बुडाली आहेत.
रविवारी मध्यरात्रीनंतर हवामानात अचानक बदल झाला व सोमवारी पहाटे ४ ते ५ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी तडाख्यामुळे शहरातील चोहोबाजूंच्या वसाहतींसह वसमत रोड, बसस्थानक परिसर व अन्य काही भागांतील सखल वस्त्यांत पाणी शिरले. काही घरांत तर दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी भरले. नागरिक झोपेत असताना घरात पाणी घुसल्याने घाबरून गेले. कपडे, धान्य, वीज उपकरणे, फर्निचरचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी गॅस सिलिंडर तरंगताना दिसले. शहरातील महत्त्वाचे रस्ते व चौक, जसे बसस्थानक परिसर, शिवाजी चौक, गांधी पार्क हे पूर्णतः पाण्याखाली गेले.
गुडघाभर पाण्यामुळे वाहनांची वाहतूक ठप्प होती. काही दुचाकी पाण्यात अडकल्या. सकाळी कार्यालयीन वेळेत नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाच्या तडाख्यामुळे नागरिकांनी महापालिका, अग्निशमन विभाग व पोलिसांकडे मदतीसाठी संपर्क साधला. काही ठिकाणी पाण्याच्या निचऱ्यासाठी पंप लावले, तर काही ठिकाणी अग्निशमन दलाने रेस्क्यू ऑपरेशन केले. मात्र पावसाचा जोर व पाण्याचे प्रमाण लक्षात घेता ही मदत अपुरी ठरली, असे नागरिकांनी सांगितले. अवकाळी व अतिवृष्टीने तालुक्यातील पेडगाव, आव्हाडवाडी, किनोळा, आर्वी, कुंभारी, कारला, कास्टगाव, पिंपळगाव, गोविंदपूर, सनपुरी, वाडी व परिसरातील अनेक गावांत कमरेइतके पाणी वाहू लागले.
महापालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची सफाई केली असल्याचा दावा केला होता. मात्र आजच्या पावसाने हे दावे हवेत विरल्याचे स्पष्ट झाले. अनेक भागांत नाले तुंबल्यामुळे पाणी रस्त्यांवर साचले. नागरिकांनी महापालिकेच्या ढिसाळ नियोजनावर संताप व्यक्त केला आहे.
परभणी तालुक्यातील परभणी मंडळात ६८.८ मिमी, पेडगाव ६८.३ मिमी, जांब ६८.३ मिमी, टाकळी कुंभकर्ण ८६.५ मिमी, गंगाखेड तालुक्यातील महातपुरी ७२.३ मिमी, माखणी ६६.५ मिमी, पूर्णा तालुक्यातील लिमला ६६.३ मिमी, चुडावा ६८.५ मिमी, पालम तालुक्यातील पालम ७६.० मिमी, पेठशिवणी ९९.३ मिमी, सोनपेठ तालुक्यातील आवलगाव ११२.३ मिमी, वडगाव ८१.८ मिमी अशाप्रकारे पावसाची नोंद प्रशासनाने केली आहे. जिल्ह्यातील आवलगाव (११२.३ मिमी) व पेठशिवणी (९९.३ मिमी) येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.