Cases will be filed against the police in the Somnath Suryavanshi death case.
परभणी, पुढारी वृत्तसेवा परभणी शहरात सहा महिन्यांपूर्वी संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर मोठा हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात पोलिसांच्या लाठीमारात आणि नंतर कोठडीत पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणातील दोषी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी दिले आहेत.
१० डिसेंबर २०२४ रोजी परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती. यानंतर ११ डिसेंबर रोजी परभणी बंदचे आवाहन करण्यात आले होते. संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणानंतर शहरातील वातावरण तणावाचे झाले होते.
१५ डिसेंबर रोजी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात गंभीर जखमी झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर १८ डिसेंबर २०२४ रोजी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी यांनी शहरातील नवा मोंढा पोलिस ठाण्यात माझ्या मुलाचा मृत्यू हा पोलिस मारहाणीतच झाल्याची फिर्याद दिली होती.
या प्रकरणी विजयाबाई सूर्यवंशी यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करत सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. अॅड. प्रकाश आंबेडकरांनी या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात जोरदार युक्तिवाद करत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिस मारहाणीतच झाल्याचे सांगितले होते. अॅड. प्रकाश आंबेडकरांना अॅड. एम. बी. संदनशिव यांनी सहकार्य केले. प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश विभा कंकनवडी, विजय देशमुख यांच्या पॅनलसमोर होऊन न्यायाधीश कंकनवडी यांनी या प्रकरणी दोषी पोलिस अधिकाऱ्यांविरुध्द विजयाबाई व्यंकटराव सूर्यवंशी यांनी १८ डिसेंबर २०२४ रोजी दिलेल्या तक्रारीच्या आधारे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात राज्य शासनाने स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, पोलिस निरीक्षक शरद मरे, सहायक निरीक्षक कार्तिकेश्वर तुरनर, चालक मोहित खान यांचे यापूर्वीच निलंबन करण्यात आले आहे. तर सुलोचना गाडेकर, दैठणकर या पोलिस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
दोषी पोलिस अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणानंतर अॅड. प्रकाश आंबेडकर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी या प्रकरणात स्वतः उभे राहून युक्तिवाद केला. आज न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे आपल्याला आनंद झाला असून, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातील पोलिस अधिकाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. सदरील खटला फास्ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी केली.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर दोषी पोलिसांविरुद्ध कारवाई करावी या मागणीसाठी राज्यभरात जनआक्रोश मोर्चे काढण्यात आले होते. विशेष म्हणजे केजचे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोन्ही घटना त्याच कालावधीत घडलेल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ विविध समाजांच्या वतीने एकत्रित काढण्यात आलेल्या या जनआक्रोश मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने समाजबांधव एकवटले होते.