

Purna taluka farmers agitation
पूर्णा: पूर्णा तालुक्यातील नावकी शिवरात आज (दि.३) सकाळी ११ च्यादरम्यान शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी पोलिस फौजफाट्यासह भूमिअभिलेख व महसूल विभागाचे तलाठी, मंडल अधिकारी, आदी पथक जमीन मोजणीसाठी आले होते.
त्या आधीच नावकी, संदलापूर, कात्नेश्वर, सुरवाडी, आहेरवाडी येथील बाधीत शेतकरी आपल्या चिमुकल्यासह झिरोफाटा रोडवर नावकी शिवारात ठिय्या मांडून बसले होते. यावेळी मोजणी अधिकाऱ्यांचा पोलिस बळाच्या जोरावर जमीन मोजणी करण्याचा मनसुबा शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे उधळला गेला. परिणामी, अधिकारी मोजणी न करताच घडल्या घटनेचा पंचनामा करुन रिकाम्या हाताने माघारी फिरले.
या आधी तीन दिवसांपूर्वी सुरवाडी येथे देखील मोजणी कार्यक्रम शेतकऱ्यांनी उधळून लावला होता. दरम्यान, शक्तिपीठ महामार्गासाठीच्या जमीन मोजणीस बाधीत शेतकरी ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करुन अधिकाऱ्यांना पिटाळून लावत आहेत. तरी देखील सरकार पोलिसांच्या बळावर शेतकऱ्यांचा विरोध झुगारून मोजणी करत आहे. यावर शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.