परभणी

CJP Jantar Mantar Protest Support : दिल्लीतील जंतर-मंतरवरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ बोरी कडकडीत बंद; व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलिस प्रशासन सतर्क असल्याने संपूर्ण बंद शांततेत व कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडला

पुढारी वृत्तसेवा

बोरी : दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झाला. कथित पोलिस लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला बोरी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडी व समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 23 जुलै रोजी बोरी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले.

सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठ, किराणा दुकाने, भाजीपाला विक्रेते, व्यापारी प्रतिष्ठाने तसेच विविध व्यावसायिकांनी आपली आस्थापने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. व्यापाऱ्यांनी शांततापूर्ण मार्गाने बंद पाळत दिल्लीतील घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त केला. बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बोरी पोलिसांनी शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ व संवेदनशील ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

पोलिस प्रशासन सतर्क असल्याने संपूर्ण बंद शांततेत व कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडला. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराचा निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आला असून, विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील. लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. बोरी शहरातील नागरिक, व्यापारी व विविध सामाजिक घटकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे बंद यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले. दिवसाभरात शहरातील व्यवहार पूर्णपणे ठप्प राहिल्याने बंदचा प्रभाव सर्वत्र जाणवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT