बोरी : परभणी-जिंतूर मार्गावरील बोरी येथे तरुणांना नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार बोरी पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईत मेफॅटरमाइन सल्फेटची दहा इंजेक्शन्स, डिस्पोजेबल सिरिंज, एक दुचाकी, एक मोबाईल असा एकूण १ लाख ७० हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तरुणांना नशेच्या विळख्यात ओढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याची मागणी जोर धरत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंतूर तालुक्यातील बोरी ठाण्याच्या हद्दीतील दीक्षाभूमी समोरील परिसरात काही युवकांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय आणि आवश्यक परवानगीशिवाय मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनची विक्री होत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सोमवार २९ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सापळा रचला. कारवाई दरम्यान आरोपींकडून प्रतिबंधित औषधाचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणात मोहम्मद शोयब कुरेशी उर्फ मोहम्मद अन्वर (२२, रा. वांगी रोड, परभणी) आणि वसीम खान अक्त्तार खान (रा. खंडोबा बाजार, परभणी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात मेफॅटरमाइन सल्फेट इंजेक्शन आयपी टर्मिवा या नावाची दहा इंजेक्शन्स, तीन डिस्पोजेबल सिरिज, एक दुचाकी (एमएच-२६, सीजी ४८०४), २० हजार रुपये किमतीचा एक मोबाईल आणि इतर साहित्याचा समावेश आहे.
वैद्यकीय क्षेत्रात मेफॅटरमाइन सल्फेट इंजेक्शनचा वापर अचानक रक्तदाब कमी झालेल्या रुग्णांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचारासाठी केला जातो. मात्र अलीकडच्या काळात काही युवक, विशेषतः जिममध्ये जाणारे तरुण, शरीरात कृत्रिम ऊर्जा निर्माण करण्यासाठी किंवा नशेसाठी या इंजेक्शनचा गैरवापर करत असल्याचे समोर आले आहे. तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारचा गैरवापर आरोग्यास अत्यंत घातक आणि हानीकारक आहे. यामुळे रक्तदाबात अनियंत्रित वाढ, मानसिक अस्थिरता, निद्रानाश, हृदयविकाराचा झटका आणि जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम २७८, १२५, १२३, ३(५) तसेच औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम १९४० मधील कलम १८ (अ), १८ (क), २७ (ब) (२) आणि औषध नियंत्रण किंमत आदेश २०१३ मधील पॅरा २६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीट जमादार राजेश विश्वनाथ जटाळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून, ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास जीपीएसआय घोरपडे हे करीत आहेत.
नशेच्या इंजेक्शनचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा
बोरी व परिसरात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. या कारवाईमुळे केवळ दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले असले तरी या संपूर्ण रॅकेटमागील मुख्य सूत्रधार कोण, इंजेक्शनचा पुरवठा कुठून होतो, त्याची विक्री कोणाच्या माध्यमातून केली जाते, याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे.
ही कारवाई लक्षात घेता तालुक्यासह जिल्ह्यात नशेच्या इंजेक्शनचे मोठे रॅकेट सक्रीय असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अशा रॅकेटचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे व्यापक मोहीम राबवावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.