बीडीएनपीएच 18-05 तुरीला केंद्राची अधिसूचना pudhari photo
परभणी

Tur Procurement : बीडीएनपीएच 18-05 तुरीला केंद्राची अधिसूचना

वनाकृविचे विकसित संकरित वाण; कोरडवाहू शेतीसाठी ठरणार नवे वरदान

पुढारी वृत्तसेवा

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राद्वारे विकसित तुरीच्या बीडीएनपीएच 18-05 या संकरित वाणास केंद्र शासनाकडून अधिकृत अधिसूचनेद्वारे मान्यता देण्यात आली. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांमार्फत विकसित व शिफारस झालेला हा पहिलाच तुरीचा संकरित वाण असून भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अधिसूचना 31 डिसेंबर अन्वये या वाणास अधिसूचित वाण म्हणून घोषित करण्यात आले.

सदर वाण महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश व छत्तीसगढ या राज्यांसाठी शिफारसीत करण्यात आला, विशेषतः कोरडवाहू परिस्थितीत लागवडीस अत्यंत उपयुक्त तो ठरणार आहे. बदलत्या हवामान पार्श्वभूमीवर शाश्वत उत्पादन देणारे हे वाण शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले. याबाबत कुलगुरू प्रा.डॉ. इन्द्र मणि म्हणाले, केंद्र शासनाच्या कडधान्य उत्पादन वाढीच्या मोहिमेत तुरीचा संकरित वाण बीडीएनपीएच 18-05 महत्त्वाची भूमिका बजावेल.

या वाणाच्या लागवडीने शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यास मोठी मदत होणार आहे. कोरडवाहू तसेच बदलत्या हवामान परिस्थितीतही हे वाण स्थिर उत्पादन देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. विद्यापीठ शेतकरी देवो भव: या भावनेतून सातत्याने संशोधन व विकासाचे कार्य करत असून बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्राने यापूर्वी तुरीच्या वाणांच्या विकासात राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली.

विशेषतः गोदावरी या तुरीच्या वाणाने कोरडवाहू क्षेत्रात एकरी 10 ते 12 क्विंटल, तर ठिबक सिंचनाखाली जवळपास 18 क्विंटल उत्पादन मिळाल्याचे अनुभव शेतकऱ्यांकडून प्राप्त झाले. गोदावरी वाणामुळे काही शेतकऱ्यांना एकरी 1 लाखांपर्यंत उत्पन्न मिळाल्याने हे वाण ऊसाला पर्याय म्हणून पाहिले जात आहे. याच धर्तीवर बीडीएनपीएच 18-05 हे संकरित वाणही शेतकऱ्यांसाठी तितकेच लाभदायक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

संशोधन संचालक डॉ.खिजर बेग यांनी या नवीन संकरित वाणाच्या प्रसाराने तुरीच्या पिकाचे उत्पादन व उत्पादनातील स्थैर्य निश्चित वाढणार असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मोठा हातभार लागेल असे म्हटले. सदर वाण विकसितसाठी कुलगुरू, संशोधन संचालक, शिक्षण संचालक भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ.राकेश आहिरे, माजी संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर व विभाग प्रमुख डॉ.हिराकांत काळपांडे यांच्या मार्गदर्शनात मुख्य शास्त्रज्ञ तथा प्रभारी अधिकारी डॉ.दीपक पाटील व शास्त्रज्ञ डॉ.विष्णू गीते यांनी प्रमुख कार्य केले. त्यांना डॉ.किरण जाधव, डॉ.प्रशांत सोनटक्के, डॉ.पी.ए.पगार व डॉ.ज्ञानेश्वर मुटकुळे यांनी सहकार्य केले. शेतकऱ्यांसाठी हे संकरित वाण लवकरच बियाण्यांच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती संशोधन केंद्राच्या वतीने देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT