परभणी

Pandharpur Ashadhi Wari 2026: विठूरायाच्या दर्शनाची आस! बाभळगावातून 'देवाचा अश्व' पंढरपूर वारीसाठी मार्गस्थ

Parbhani news | शतकाहून अधिक काळ जपलेली भक्तीची परंपरा कायम

पुढारी वृत्तसेवा

हनुमान चव्हाण

पाथरी : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवाचे प्रतीक असलेल्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथून शतकाहून अधिक काळ अखंडपणे सुरू असलेला ‘देवाचा अश्व’ दि २३ मंगळवारी रोजी मोठ्या भक्तिभावात आणि धार्मिक वातावरणात पंढरपूरकडे रवाना झाला. वारकरी संप्रदायात विशेष मानाचे स्थान असलेल्या या परंपरेमुळे बाभळगावची ओळख राज्यभर निर्माण झाली आहे.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याशी निगडित असलेला हा अश्व केवळ एक प्राणी नसून वारकरी भक्ती, श्रद्धा, समर्पण आणि विठ्ठलभक्तांच्या अखंड विश्वासाचे प्रतीक मानला जातो. वारकऱ्यांच्या मते या अश्वामध्ये माऊलींच्या कृपेचे आणि विठ्ठलाच्या आशीर्वादाचे अधिष्ठान असल्याची भावना असून, त्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये विशेष उत्सुकता असते.

वारीसाठी प्रस्थान करण्यापूर्वी बाभळगाव येथे जिल्हा परिषद सदस्या वैजयंती अण्णासाहेब रनेर, गणेश रनेर तसेच रणेर कुटुंबीयांच्या हस्ते अश्वाची विधिवत पूजा करण्यात आली. फुलांच्या माळांनी सजविलेल्या अश्वाला हळद-कुंकू, अक्षता आणि नैवेद्य अर्पण करून मंगल आरती करण्यात आली. यावेळी टाळ-मृदुंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा-तुकोबा’ आणि ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

गावातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांनी अश्वाचे दर्शन घेत त्याला वंदन केले. अनेकांनी आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करत अश्वाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला.

वारकरी परंपरेतील मानाचा वारसा

परंपरेनुसार हा अश्व प्रथम पंढरपूर येथे नेण्यात येतो. तेथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन आणि पूजन झाल्यानंतर तो संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत वारीत सहभागी होतो. वारीदरम्यान हा अश्व वारकऱ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरतो. पालखी मार्गावर हजारो भाविक अश्वाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. अश्वाचे दर्शन म्हणजे माऊलींच्या कृपेचा आणि विठ्ठलाच्या आशीर्वादाचा लाभ मिळाल्याची भावना वारकऱ्यांमध्ये असते.

तीन पिढ्यांपासून जपली भक्तीची परंपरा

बाभळगाव येथील रणेर कुटुंबीयांनी तीन पिढ्यांपासून ही परंपरा अत्यंत निष्ठेने जपली आहे. वर्षभर अश्वाच्या संगोपनासाठी विशेष काळजी घेतली जाते. त्याच्या आरोग्याची तपासणी, पौष्टिक आहार, प्रशिक्षण आणि देखभाल याकडे विशेष लक्ष दिले जाते. ही सेवा केवळ परंपरा म्हणून नव्हे, तर विठ्ठलसेवा मानून कुटुंबीय पार पाडतात.

आठ ते नऊ वर्षांनी नवीन अश्वाची निवड

या परंपरेनुसार साधारण आठ ते नऊ वर्षांनी नवीन अश्व खरेदी केला जातो. जुन्या अश्वाला सन्मानाने निवृत्त करण्यात येते. नव्या अश्वालाही धार्मिक विधी, पूजन आणि पारंपरिक संस्कार करूनच वारी सेवेसाठी तयार केले जाते. त्यामुळे परंपरेची पवित्रता आणि सातत्य आजही अबाधित राहिले आहे.

भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतीक

आषाढी वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा, समतेचा आणि समाजएकतेचा संदेश देणारा महोत्सव आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेत बाभळगावच्या ‘देवाच्या अश्वा’चे योगदान विशेष मानले जाते. विठ्ठलभक्तीचा वारसा जपत रणेर कुटुंबीयांनी जो धार्मिक आणि सांस्कृतिक ठेवा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविला आहे, तो संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

‘देवाचा अश्व’ म्हणजे वारकऱ्यांच्या श्रद्धेचे प्रतीक

वारकरी संप्रदायात ‘देवाचा अश्व’ हा संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मानकरी मानला जातो. वारीच्या प्रवासात हा अश्व संतांच्या उपस्थितीचे आणि विठ्ठलभक्तीच्या अखंड परंपरेचे प्रतीक समजला जातो. त्यामुळे या अश्वाला विशेष धार्मिक मान असून त्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये मोठी श्रद्धा आणि उत्सुकता असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT