Sainagar Shirdi Express robbery  Pudhari
परभणी

Parbhani Train Robbery | मानवतरोडजवळ साईनगर शिर्डी एक्सप्रेसवर सशस्त्र दरोडा; तलवारीच्या धाकाने दागिने, रोकड लुटली

दरोडेखोरांनी स्थानकापासून सुमारे 2 किमी अंतरावर सिग्नल यंत्रणेत बिघाड घडवून आणला.

पुढारी वृत्तसेवा

Sainagar Shirdi Express robbery

मानवत : काकीनाडा ते शिर्डी धावणाऱ्या (क्रमांक 17206) साईनगर शिर्डी एक्सप्रेसला मानवतरोड रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत छेडछाड करून थांबवण्यात आले आणि 8 ते 10 दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची गंभीर घटना गुरुवारी (दि.16) पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, काकीनाडा येथून बुधवारी (दि. 15) सकाळी 5 वाजता निघालेली ही सुपरफास्ट एक्सप्रेस परभणी येथे मध्यरात्री दीडच्या सुमारास पोहोचली. तेथे सुमारे एक तास थांबल्यानंतर गाडी रात्री 2:36 वाजता जालन्याकडे मानवतरोड मार्गे रवाना झाली. मानवतरोड स्थानकाला या गाडीचा अधिकृत थांबा नसतानाही, अज्ञात दरोडेखोरांनी स्थानकापासून सुमारे 2 किमी अंतरावर सिग्नल यंत्रणेत बिघाड घडवून आणला. लाल सिग्नलमुळे गाडी सुमारे 2:50 वाजता थांबली.

गाडी थांबताच दरोडेखोरांनी जनरल आणि एस-4 डब्यात घुसून तलवारीचा धाक दाखवत विशेषतः महिला प्रवाशांकडील दागिने व रोख रक्कम लुटली. रेल्वे सुरक्षा बल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आरोपी फरार झाले.

दरम्यान, सिग्नल बिघाडाची माहिती मिळताच मानवतरोड येथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन दुरुस्ती केली. या प्रकारामुळे गाडी सुमारे 55 मिनिटे थांबली होती. त्यानंतर पहाटे पावणे चारच्या सुमारास गाडी जालन्याकडे रवाना झाली. या दरोड्यात छत्रपती संभाजीनगर आणि हैदराबाद येथील काही महिला प्रवाशांचे दागिने लुटल्याची माहिती मिळाली असून, नेमकी किती हानी झाली याचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.

दरम्यान, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप कांबळे तसेच जीआरपीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश जोगदंड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मानवतरोड परिसरात यापूर्वीही प्रवाशांच्या गळ्यातील चैन व मंगळसूत्र चोरीच्या घटना वारंवार घडल्या आहेत. त्यामुळे येथे कायमस्वरूपी रेल्वे पोलीस चौकी स्थापन करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून वारंवार केली जात असली, तरी रेल्वे प्रशासनाकडून अद्याप त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT