Parbhani Politics : परभणी झेडपीत खाते वाटपावरून सत्तासंघर्ष; अंतर्गत वादातून सभेत प्रचंड गदारोळ

अपेक्षित खाते न मिळाल्याने सभापतींचे 'राजीनामा नाट्य'; रात्री उशिरापर्यंत तणावपूर्ण वातावरण
Parbhani Zilla Parishad
Parbhani Zilla Parishad
Published on
Updated on

परभणी : जिल्हा परिषदेत विषय समित्यांच्या खाते वाटपावरून सत्ताधारी गटातील अंतर्गत मतभेद उफाळून येत बुधवारी (दि.१५) झालेली विशेष सभा अक्षरशः राजकीय रणांगण ठरली. सभापतींना अपेक्षित खाते न मिळाल्याने निर्माण झालेल्या नाराजीने राजीनामा नाट्य रंगले, तर स्थायी समिती सदस्यांच्या निवडीतही पक्षांतर्गत गटबाजी उघड झाल्याने संपूर्ण प्रक्रिया तणावपूर्ण वातावरणात पार पडली.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लता वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आलेली ही सभा दुपारी सुरू झाली असली तरी रात्री उशिरापर्यंत ती सुरूच राहिली. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर व सभापतीं वैशाली पंकज जाधव यांना खाते वाटप करण्यात आले. उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर यांच्याकडे अर्थ व बांधकाम, तर वैशाली पंकज जाधव यांच्याकडे शिक्षण व आरोग्य खाते सोपवण्यात आले. मात्र, कृषी व पशुसंवर्धन हे खाते शिवसेना शिंदे गटाच्या कौशल्याबाई तुकाराम शिंदे यांच्याकडे जाणार असल्याचे स्पष्ट होताच शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यातूनच राजकीय नाट्य रंगत गेले.

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट सभागृहात धाव घेत संबंधित सभापतीचा राजीनामा घेण्याची मागणी केली. मात्र सभा सुरू असताना अशी प्रक्रिया शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने वातावरण अधिकच तापले. या घडामोडींनी केवळ खातेवाटपाचा प्रश्न राहिला नसून सत्ताधारी गटातील समन्वयाचा अभाव आणि नेतृत्वावरचा विश्वास डळमळीत होत असल्याचे संकेत दिले. दरम्यान, स्थायी समितीच्या आठ सदस्यांच्या निवडीसाठीही मोठी चुरस पाहायला मिळाली. एकाच पक्षातील अनेक इच्छुकांनी उमेदवारी दाखल केल्याने अंतर्गत संघर्ष उघड झाला. या प्रक्रियेत विविध गटांनी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसून आले.

राजकीय विश्लेषकांच्या मते, ही संपूर्ण घटना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेची समीकरणे किती नाजूक असतात याचे द्योतक आहे. महिला सभापतींची बिनविरोध निवड हा सकारात्मक संदेश देणारा टप्पा ठरला असला तरी त्यानंतर लगेचच खाते वाटपावरून निर्माण झालेला वाद सत्ताधारी व्यवस्थेतील समन्वयाच्या अभावाकडे बोट दाखवतो. यामुळे पुढील काळात जिल्हा परिषदेत निर्णय प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गटबाजी वाढल्यास विकासकामांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. एकंदरीतच, परभणी जिल्हा परिषदेत सध्या राजकीय स्थैर्यापेक्षा सत्तासंघर्षच अधिक ठळकपणे पुढे येताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news