A minor laborer died after falling into a canal.
सेलू; पुढारी वृत्तसेवाः
कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी कमी वयात मजुरी करणाऱ्या एका १७वर्षीय तरुणाचा पाय घसरून कालव्यात पडल्याने मृत्यू झाला. शेख साजीद शेख माजिद (वय १७, रा. राजमोहल्ला, सेलू) असे मयत तरुणाचे नाव आहे. ही हृदयद्रावक घटना सेलू तालुक्यातील सोनवटी शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर बुधवारी (दि. १७) सायंकाळी घडली. गुरुवारी (दि. १८) सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला.
साजीद हा सोनवटी येथील व्यंकटी धुमाळ यांच्या बांधकामावर मजुरीचे काम करत होता. बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तो कालव्यावर पाणी आणण्यासाठी गेला असता, पाण्याचा अंदाज न आल्याने किंवा पाय घसरल्याने तो थेट कालव्याच्या प्रवाहात पडला. तो बराच वेळ परत न आल्याने सहकारी आणि ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी कालव्याच्या काठावर पायांच्या खुणा दिसून आल्याने तो पाण्यात पडल्याचा संशय बळावला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राऊत, हवालदार सूर्यवंशी, शिपाई आघाव व डुबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, रात्रीचा अंधार आणि पाण्याचा वेगवान प्रवाह यामुळे शोधकार्यात अडथळे आले. गुरुवारी सकाळी पुन्हा पोलिस पाटील माणिकराव सोळंके, रामचंद्र पारवे आणि नातेवाईकांच्या मदतीने शोधमोहीम राबवली असता, साजीदचा मृतदेह मिळून आला. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.