35 Gram Panchayat Officials Receive 'Ideal' Awards
परभणी, पुढारी वृत्तसेवा : शहरातील पाथरी रोडवरील राजलक्ष्मी लॉन्स येथे शुक्रवारी (दि.२७) जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन वर्षांतील एकूण ३५ गुणवंत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लताताई विजयकुमार वाकळे होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अॅड. श्रीकांत भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, प्रकल्प संचालक डॉ. स्मिता पाटील, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे राज्याध्यक्ष संजीव निकम, गटनेते दिलीपराव देशमुख, परभणी, पाथरी, मानवत पंचायत समितीचे सभापती,
उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, प्रकल्प संचालक जयंत गाढे, कार्यकारी अभियंता दिनकर घुगे, राज्य कोषाध्यक्ष अशोक भोसले, जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा दुधाटे उपस्थित होते. प्रास्ताविकातून उप मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण म्हणाले, सर्वाधिक योजना या पंचायत विभागामार्फत राबविल्या जातात.
ग्राम विकासाचा कणा म्हणून ग्रामपंचायत अधिकारी आणि विस्तार अधिकारी हे आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. सूत्रसंचालन संवाद तज्ज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले.