

मानवत : पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत मानवत तालुक्यातील कोल्हावाडी गावाने अभिमानास्पद यश संपादन केले आहे. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागातून कोल्हावाडी गावाची प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली आहे. शासनाने 50 लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाच्या वतीने अभियान माझी वसुंधरा मध्ये उच्चतम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाची घोषणा शासनाच्या पर्यावरण विभागाने 17 फेब्रुवारी केली. राज्य सरकारकडून पर्यावरण विभागा मार्फत राज्यात मागील पाच वर्षांपासून माझी वसुंधरा अभियान पृथ्वी, वायु ,जल ,अग्नी आणि आकाश या 5 थीमवर राबविण्यात आले.
माझी वसुंधरा 5.0 हे अभियान 1 जून 2004 ते 31 मार्च 2025 या कालावधीत राबविण्यात आले, राज्यातील सर्व ग्राम पंचायतीने या अभियानात मध्ये सहभाग नोंदवला, अभियान कालावधीत डेस्कटॉप मूल्यांकन व फील्ड मूल्यमापन हे त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात आले दोन्ही मूल्यमापनातील सर्वाधिक एकूण गुणाचे आधारे प्रत्येक विभागातुन लोकसंख्या आधारे निवड करण्यात आली. मराठवाडा विभागातुन परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील कोल्हावाडी ग्राम पंचायतला 5.0 मध्ये 1 हजार लोकसंख्याच्या आत ग्राम पंचायत मध्ये मराठवाडा विभागात अव्वल स्थान मिळाले असून राज्य शासनाने 50 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
कोल्हावाडी गावाने काय काम केले ...
गावपातळीवर वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्त उपक्रम, जलसंवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता मोहिमा प्रभावीपणे राबविल्यामुळे ही निवड करण्यात आली . ग्रामपंचायत, स्थानिक नागरिक, महिला बचत गट तसेच युवक मंडळांच्या सहभागातून पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविण्यात आले.
या यशामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. पर्यावरण संवर्धन ही केवळ योजना नसून सामूहिक जबाबदारी आहे, असे मत गावातील नागरिकांनी व्यक्त केले. प्रत्येक नागरिकांच्या परिश्रमातून मिळालेल्या या यशामुळे कोल्हावाडी गावाने इतर गावांसमोर आदर्श निर्माण केला आहे. दरम्यान, कोल्हावाडीच्या या यशाबद्दल तालुक्यातून ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हे अभियान राबिवीत असतांना गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे , विस्तार अधिकारी कानडे , विभागीय तांत्रिक तज्ञ विक्रम पुरी ,ग्राम पंचायत अधिकारी मनीषा लोमटे ,सरपंच जिजाबाई आठवे, माजी सरपंच वर्षा भिसे,निवृत्त मंडळ अधिकारी बाबासाहेब धोपटे ,ग्राम पंचायत सदस्य दत्तराव भिसे ,रामेश्वर धोपटे, तुकाराम भिसे ,काशिनाथ भिसे गावतील ऋषिकेश भिसे, ज्ञानदीप भिसे ,अमोल भिसे, यांचे सहकार्य लाभले.