22nd installment of PM-KISAN on March 13; Prime Minister's interaction with farmers via live broadcast in Parbhani
परभणी, पुढारी वृत्तसेवा :
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्याच्या २२ व्या हप्त्याचे वितरण १३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात येणार आहे. या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत हप्त्याचे वितरण करणार आहेत.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात एलसीडीद्वारे करण्यात येणार असून, परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पीएम-किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे यांसारख्या शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात काही प्रमाणात मदत मिळते. त्यामुळे देशातील लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.
दरम्यान, या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासनाने थेट प्रक्षेपणासाठी आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय तयारी पूर्ण केली आहे. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार असल्याने परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी उपस्थित राहावेत, असे आवाहन परभणी बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.