Akoli Warkari Shikshan Sanstha Food Poisoning Pudhari
परभणी

Parbhani Students Food Poisoning | अकोलीच्या वारकरी शिक्षण संस्थेतील १८ विद्यार्थ्यांना विषबाधा

कढी-भात खाल्ल्यानंतर मळमळ, डोकेदुखीचा त्रास; चौघांना पुढील उपचारासाठी परभणीला हलविले

पुढारी वृत्तसेवा

Akoli Warkari Shikshan Sanstha Food Poisoning

गंगाखेड : गंगाखेड तालुक्यातील अकोली येथील वारकरी शिक्षण संस्थेतील १८ विद्यार्थ्यांची कढी-भात खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडल्याची घटना समोर आली आहे. मळमळ आणि डोकेदुखीचा त्रास जाणवू लागल्याने विद्यार्थ्यांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी चार विद्यार्थ्यांचा रक्तदाब कमी-जास्त होत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले.

अकोली येथील वारकरी शिक्षण संस्थेत सुमारे ६५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संबंधित दिवशी रात्रीच्या जेवणात कढी-भात खाल्ल्यानंतर काही विद्यार्थ्यांना मळमळ आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर संस्थाचालक आकाश महाराज शास्त्री यांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांना उपलब्ध औषधांच्या गोळ्या दिल्या. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी त्रास वाढल्याने विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सुरुवातीला चार विद्यार्थ्यांना गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य विद्यार्थ्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशा एकूण १८ विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले. यातील चार विद्यार्थ्यांचा रक्तदाब कमी-जास्त होत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना परभणी येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. परभणी येथे हलविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचाही रक्तदाब आता सुरळीत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे संस्थेतील विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

विषबाधेचा संशय असलेले विद्यार्थी

प्रतीक कैलास यादव, रामेश्वर श्रीधर माने, सोहम वसंत सानप, विनायक भागवत लोंढे, शुभम यमगर, गणेश बापूराव मदने, मंथन मोतीराम काटे, समर्थ रुस्तुम देवकते, यश किसन माने, ऋषिकेश अशोक माने, अभिषेक विक्रम मुंडे, रमेश केशव ढाकणे, योगीराज मारुती सुरनर, ईश्वर गोविंद डिगोळे, जनार्दन दिगंबर पांढरे, कृष्णा रंगनाथ सावळे आणि कृष्णा बालासाहेब यमगर यांचा बाधित विद्यार्थ्यांमध्ये समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT