Parbhani Agriculture News : २० आरमध्ये निघाले अर्धाच किलो सोयाबीन

पूर्णा : कोरड्या दुष्काळाने शेतकरी भरडला; हेक्‍टरी ५० हजार अनुदान द्या
Purna Soybean Crop Loss
Purna Soybean Crop Losspudhari photo
Published on: 
Updated on: 

पूर्णा: अत्यल्प पावसावर पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाला यंदा कोरड्या दुष्काळाचा जबर फटका बसला असून, उभे पीक शेंगा लागून वाळून गेले आहे. तालुक्यात सुरू असलेल्या पीक कापणी प्रयोगातून दुष्काळाची भीषणता समोर येत असून, २० आर क्षेत्रातील सोयाबीनच्या प्लॉटमधून अवघे अर्धा किलो उत्पादन मिळत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. त्यामुळे पेरणीसाठी टाकलेल्या बियाण्याइतकेही उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला.

पूर्णा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिली. अत्यल्प पावसाच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. सुरुवातीला पीक उगवले; मात्र त्यानंतर पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने पिकाची वाढ खुंटली. शेंगा लागल्या; परंतु दाणे भरण्याच्या काळात आवश्यक पाऊस न झाल्याने शेंगा चपट्या राहिल्या. त्यातील दाणे अत्यंत बारीक राहून पीक पूर्णपणे वाळून गेले.

Purna Soybean Crop Loss
Nanded Crime : नांदेडमध्ये पाच सराईत गुन्हेगारांवर 'मोक्का'

पिकाला शेंगा लागल्या असल्या तरी त्यातील दाणे अत्यंत बारीक व अपुरे भरले आहेत. अनेक शेंगांमध्ये ज्वारीच्या दाण्याएवढेही सोयाबीनचे दाणे तयार झालेले नाहीत. परिणामी पुढील हंगामासाठी बियाणे राखून ठेवणेही शेतकऱ्यांना शक्य होणार नाही. पेरणीसाठी खर्च केलेल्या बियाण्याइतकेही उत्पादन मिळत नसल्याने यंदाचा खरीप शेतकऱ्यांसाठी आर्थिक संकटाचा ठरला आहे. पावसाने पाठ फिरवल्याने केवळ पिकांचेच नुकसान झालेले नाही, तर भूजलपातळीही मोठ्या प्रमाणात खालावली आहे.

विहिरी, बोअरवेल आणि इतर पाणवठे कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. दिवसभर कडक ऊन आणि वाढत्या उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा पूर्णपणे निघून गेला आहे. शासनाने परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळ जाहीर केला असला तरी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, याची प्रतीक्षा कायम आहे. हेक्टरी किती अनुदान मिळणार, त्याचे निकष काय असणार आणि मदत कधी खात्यावर जमा होणार, याबाबत स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.

Purna Soybean Crop Loss
Tuljabhavani Jyot Yatra : तुळजाभवानीच्या ज्योतिसाठी हजारो भक्तांची पायपीट!

दसरा- दिवाळीचे सण तोंडावर आले. त्यामुळे सणापूर्वी शासनाकडून मदत मिळणार की शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा आश्वासनच पडणार, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. मागील खरीपातील पीक विम्याची भरपाई अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नसताना चालू खरीपातील पीक कापणी प्रयोग सुरू आहेत. त्यामुळे पीक कापणी प्रयोग, पंचनामे आणि कागदोपत्री प्रक्रिया करूनही प्रत्यक्ष भरपाई मिळण्यास विलंब होणार नाही ना? असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

गेल्या आठवडाभरापासून महसूल व कृषी विभागाचे अधिकारी शेतांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पीक कापणी प्रयोगांमधून प्रत्यक्ष उत्पादनाची स्थिती समोर येत असतानाच प्रशासनाने आता कागदी प्रक्रिया पूर्ण करण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे.

कापणी केली; मळणीला उत्‍पादनच नाही

सध्या तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये कृषी व महसूलच्या वतीने शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोग होत आहेत. यादृच्छिक पद्धतीने प्लॉटची निवड करून सोयाबीनची कापणी व मळणी हाेत आहे. या प्रयोगांत काही ठिकाणी उत्पादनाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली. २० आर क्षेत्रातील प्लॉटमधून अवघे अर्धा किलो सोयाबीन हाती येत असल्याने शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला. अनेक ठिकाणी सोयाबीनच्या कडप्यांत दाणेच नसल्याचे दिसत आहे. काही शेतांतील कापणी केलेले पीक पाहता ते जनावरांच्या चाऱ्यापेक्षा चुली पेटविण्यासाठी जळण म्हणून वापरावे, अशी अवस्था झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news