12 acres of sugarcane burnt in Mumbar, three farmers suffer losses worth lakhs
पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मुंबर गावातील शेतांमध्ये गुरुवारी (दि.२७) मध्यरात्री १ ते १.३० वाजेच्या सुमारास आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक तपासात म्हटले जात आहे की, कोणी-तरी अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची शक्यता आहे. आगीत तीन शेतकऱ्यांचा एकूण १२ एकर ऊस जळून खाक झाला असून आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले.
सदर आगीत शेतकरी सखाराम व्यंकटराव शिंदे व बालासाहेब ज्ञानोबा शिंदे (गट क्र.७१) मधील ३ एकर ऊस, गोविंद माधवराव शिंदे (गट क्र. ७४) मधील ६ एकर ऊस, उध्दव हरीभाऊ शिंदे व भास्कर हरिभाऊ शिंदे (गट क्र.५३) मधील ३ एकर ऊस जळाला आहे, तसेच पाईपही जळून खाक झाले. आग काही मिनिटांतच विक्राळ रूप धारण करून शेजारील शेतांपर्यंत पसरत गेलेली होती. मात्र शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळे १० एकरावरील शेजारील ऊस सुरक्षित ठेवता आला. शेतकऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन ऊस पिकवला होता.
आग लागल्याने तोडणीस आ लेला ऊस जळून खाक झाला, त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हातातोंडाशी आलेला घास क्षणात जळून खाक झाला आहे, मेहनतीवर पाणी फिरले आहे. ही घटना फक्त आर्थिक नुकसानीपुरती मर्यादित नाही, तर शेतकऱ्यांच्या भावनिक आणि मानसिक स्थितीवरही परिणाम करत आहे. रात्रभर काम करून जो ऊस मोठा केला होता, तो क्षणात जळून नष्ट झाला.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कारखानदारांकडे विनंती केली की, जळालेला ऊस लवकरात लवकर कारखान्यांनी घेऊन जावा, कारण तो दिवसेंदिवस खराब होत असल्याने शेतकऱ्यांना आणखी आर्थिक तोटा होण्याची भिती आहे. आम्ही रात्रंदिवस मेहनत घेतली होती, पण आग लागल्याने मेहनतीवर पाणी फिरले. त्यामुळे कारखानदारांनी मदत करावी, असे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. प्रशासनाने घटनास्थळी आग कुणी लावली याबाबत तपास सुरू केला आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.