मराठवाडा

परभणी: मानवत बाजार समिती निवडणूक; १८ जागांसाठी ५१ जण रिंगणात, उमेदवाराच्या मृत्यूने पेच

अविनाश सुतार

मानवत; पुढारी वृत्तसेवा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकूण १८ जागेसाठी एकूण ५४ उमेदवार निवडणूक रिंगणात विविध आघाडी व पक्षाच्या माध्यमातून राहिले आहेत. आज (दि. २१) सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. परंतु, या निवडणुकीत उभे असलेल्या एका उमेदवाराचे अचानक निधन झाल्याने पेच निर्माण झाला असून कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतला जाणार आहे.

सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघात माजी सभापती पंकज आंबेगावकर, राष्ट्रवादीचे नेते कारभारी आवचार, आकाश पंडितराव चोखट, शिवसेनेचे दत्ता जाधव, अॅड. सुनील जाधव, वैजनाथ पठाडे, नगरपालिकेचे माजी नगरसेवक अॅड. किरण बारहाते, माजी संचालक अॅड. सतीश बारहाते, पंचायत समितीचे माजी सभापती बंडू मुळे, भाजपचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ लाडाने यांच्यासह एकूण २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

सहकारी संस्थेच्या महिला राखीव मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वैशाली जाधव, मिरा मांडे यांच्यासह माधुरी कदम, गंगासागर चोखट व गीता यादव रिंगणात आहेत.

सहकारी संस्थेच्या इतर मागासवर्गीय मतदारसंघात गजानन घाटूळ व चंदाताई सोनेकर यांच्यात थेट लढत आहे. सहकारी संस्थेच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती या मतदारसंघात भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य चिटणीस अनंत गोलाईत, गणेश नाईक, शेषराव जोरवर, सोमित्रा हिंगे आपले नशीब आजमावत आहेत.

ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण जागेसाठी माजी सभापती नारायण भिसे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष लाडाने, उद्धव ठाकरे गटाचे कृष्णा शिंदे यांच्यासह ६ जण रिंगणात आहेत. ग्रामपंचायतच्या अनुसूचित जाती व जमाती मधून संघपाल ठेंगे व अंबादास तूपसमुंद्र यांच्यात थेट लढत आहे . ग्रामपंचायतच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अमोल कदम व मीरा सुरवसे रिंगणात आहेत.

व्यापारी मतदारसंघात माजी नगराध्यक्ष महेश कोक्कर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, जुगलकिशोर काबरा, ज्ञानेश्वर पुकाने हे ४ जण रिंगणात आहेत. हमाल व तोलारी मतदारसंघात माजी सदस्य सोपान वाघमारे यांना बाळासाहेब भदर्गे व रंगनाथ वावरे यांचे आव्हान आहे.

उमेदवाराच्या मृत्यूने पेच

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चिन्ह वाटपाच्या दिवशीच सहकारी संस्था मतदारसंघात सर्वसाधारण गटात उभे असलेले मंगरूळ बु. येथील रावसाहेब भुजंगराव कदम यांचे अचानक निधन झाल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. निवडणूक प्रक्रिया या कारणाने स्थगित करावी, अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकारी जयंत पाठक यांच्याकडे करण्यात आली आहे. या प्रकरणी वरिष्ठांचा सल्ला घेऊन कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतला जाईल, असे जयंत पाठक यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT