जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : घरामध्ये कोणी नसताना भर दिवसा दोघाजणांनी घरात घुसून एका डॉक्टर महिलेवर चाकूने वार केला. ही घटना परभणीच्या जिंतूर शहरातील गणेशनगर येथे आज (दि.२५) घडली. डॉ. ज्योती सांगळे असे जखमी झालेले महिला डॉक्टरचे नाव आहे. त्यांच्यावर सध्या जिंतूर शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. तर अज्ञात हल्लेखोरांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
जिंतूर शहरातील गणेशनगर येथे डॉ गणेश सांगळे हे पत्नी डॉ. ज्योती सांगळे आणि मुलीसह राहतात. आज (दि.२५) रोजी डॉ. ज्योती सांगळे या मुलीसह दुपारी घरामध्ये घर काम करत असताना दुपारी अचानक दोघेजण घरामध्ये शिरले. दोघातील एकाने लहान मुलीला चाकूचा धाक दाखवला. तसेच डॉ. ज्योती सांगळे यांना चाकू लावला. त्यामुळे डॉ. ज्योती सांगळे यांनी आरडाओरड केल्याने हल्लेखोरांनी डॉक्टर ज्योती सांगळे यांच्यावर वार करून घरामधून पळ काढला. चाकूने वार केल्याने डॉ. सांगळे यांच्या बोटाला दुखापत झाली आहे.
शेजाऱ्यांनी डॉक्टर सांगळे यांच्या घराकडे धाव घेऊन त्यांना उपचारासाठी जिंतूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. शेजाऱ्यांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस करत आहेत. मात्र अज्ञात हल्लेखोरने हल्ला का केला. याबाबत माहिती मिळू शकली नाही. पोलीस तपासाअंती या प्राणघातक हल्ल्याविषयी उलगडा होऊ शकेल.
हेही वाचलंत का ?