पैठण; चंद्रकांत अंबिलवादे : पैठण तालुक्यातील विविध गावामध्ये वेगवेगळ्या कारणाने पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्ह्यांचे सत्र सुरू आहे. पाचोड, एमआयडीसी, बिडकीन या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एकाच आठवड्यात दोन महिलांचा खून व दोन आत्महत्या झाल्याची घटना घडल्यामुळे परिसर सुन्न झाला आहे.
अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील कारकीन येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून केला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. दि.३१ रोजी बानीब शहाजहान शहा (वय ३० वर्ष) व अल्तमश या चार वर्षांच्या मुलासह पत्नीचा खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह स्वतःच्या विहिरीत टाकून दिला असल्याचा तपास सुरू आहे.
पाचोड हद्दीतील गेवराई मर्दा येथे दि.३१ रोजी सायमाबी कैसर सय्यद (वय २४ वर्ष) या महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. हा घातपात होता की आत्महत्या यासंदर्भात पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश सुरासे अधिक तपास करीत आहेत.
बिडकीन पोलिस ठाण्याच्या हद्दीत पैठणखेडा येथे दि. ४ जुन रोजी जमीन वाटणीच्या कारणावरून संगीता बाबासाहेब अवधूत (वय ४० वर्ष) या महिलेने सासरच्या मंडळींना कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.
याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस स्टेशन समोर असलेल्या भारतनगर बिडकीन येथे आणखी एक घटना घडली. दि. २ जुन रोजी सकाळी हालिमाबी वजीर शेख (वय ७५ वर्ष) महिलेचा खून करण्यात आला. नातेवाईकाचा मुलगा शेख राजू इसाक रा. करंजखेडा ता. गंगापूर यांनी पैशाच्या लालसेपोटी केल्याचा प्रकार घडला. या आरोपीसह एमआयडीसी पोलिस ठाणे परिसरातील कारकीन येथील खून प्रकरणातील आरोपी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनेमुळे परिसर सुन्न झाले असून या घटनेसह इतर घटनेचा तपासाच्या दृष्टिकोनातून संबंधित पोलिस ठाण्याला उपस्थित राहून ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्यासह तपासतज्ज्ञ वेळोवेळी तपास आढावा घेताना दिसून येत आहे.
हेही वाचा