Yelegaon in discussion; come Srijaya's residence in the house number 0, without address!
संजीव कुळकर्णी
नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे प्रकल्पस्थळ निश्चित झाले तेव्हा म्हणजे सुमारे ३५ वर्षांपूर्वी येळेगाव (ता. अर्धापूर) हे गाव सर्वप्रथम चर्चेत आले. पुढील काळात याच गावच्या मतदारयादीत बड्या राजकीय घराण्यातील दोन भगिनींची नावे समाविष्ट करण्यात आल्यानंतर या गावाची ओळख ठळक झाली. याच गावात भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण यांचे वास्तव्य ० क्रमांकाच्या, बिनपत्त्याच्या घरात असल्याची बाब समोर आल्यानंतर हे गाव पुन्हा चर्चेत आले आहे.
भोकर आणि चव्हाण कुटुंबाचे नाते गेल्या ६० वर्षांहून अधिक कालखंडाचे. १९६२ ते १९८० पर्यंत शंकरराव चव्हाण यांनी जुन्या भोकर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना मंत्रिपदासह मुख्यमंत्रीपद भूषविले. त्यानंतर मोठ्या खंडाने या मतदारसंघाचा 'सात-बारा' अशोक चव्हाण व त्यांच्या परिवाराच्या नावे झाला, तरी शंकररावांसह त्यांच्या परिवारातील कोणीही या मतदारसंघात वास्तव्याचे स्थळ निर्माण केले नाही.
चव्हाण परिवारातील सदस्यांशिवाय गोरठेकर परिवारातील बाबासाहेब आणि बापूसाहेब देशमुख यांनी वेगवेगळ्या कालखंडात भोकर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. तेव्हा या मतदारसंघात उमरी-धर्माबाद भागाचा समावेश होता. गोरठेकर पिता-पुत्रांचे वास्तव्य तेव्हाच्या मतदारसंघातील उमरी-गोरठा येथील निवासस्थानांमध्ये राहिले, तर डॉ. माधव किन्हाळकर यांनी नांदेडमध्ये वास्तव्य करून भोकर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, तरी त्यांनी भोकर शहरातील वडिलोपार्जित घराच्या पत्त्यावर मतदार म्हणून आपली नोंद केली, ती आजही कायम आहे.
शंकरराव व कुसुमताई चव्हाण यांची मतदार म्हणून नोंद धनेगाव परिसरातील त्यांच्या शेतातील निवासी पत्त्यावर होती. तर अशोक व अमिता चव्हाण यांचे नाव नांदेडच्या शिवाजीनगर प्रभागात नोंदले गेले असून त्यांचे निवासस्थान याच भागात असले, तरी आपल्या लाडक्या कन्यांना मतदार करताना येळेगाव मधील 'बिनपत्त्याचे घर' त्यांनी का निवडले, हा आता संशोधनाचा विषय झाला असून येळेगावमधील ० क्रमांकाचे घर त्य गावच्या कोणत्या प्रभागात, कोणत्य गल्लीत आहे, याचा शोध घेण्याची वेळ तक्रारकर्ते संदीपकुमार देशमुख बारडकन यांनी संबंधितांवर आणली आहे.
जिल्ह्याच्या अन्य मतदारसंघांचे आमदारही नांदेडमध्ये वास्तव्यास आहेत त्यांत प्रतापराव पाटील चिखलीकर, राजेश् पवार, डॉ. तुषार राठोड यांचा समावेश आहे अलीकडे किनवटचे आमदार भीमराव केराम यांनीही नांदेडमध्ये घर घेतले तरी आपल्या मतदारसंघातील गावांमध्येह त्यांचे कायमस्वरूपी घर आहे. पण एसआयआर प्रक्रियेमध्ये आमदान श्रीजयांचे येळेगावच्या मतदारयादीतील नाव कायम राखण्यासाठी मतदान केंद्र अधिकाऱ्यास नांदेडला यावे लागल्याच माहिती समोर आली आहे.
मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान नियुक्त अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारक्षेत्रातील मतदारांची तपासणी काटेकोरपणे करावी, अशी सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली होती. त्यानुसार येळेगाव या गावातील मतदारांची तपासणी करताना आ. श्रीजया व त्यांच्या भगिनी सुजया यांचे वास्तव्य या गावामध्ये कोणत्याही घरात नसल्याची बाब संबंधितांच्या लक्षात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी नंतर नांदेड शहर गाठून आ. श्रीजया यांची प्रत्यक्ष भेट घेतली व मतदारयादीतील त्यांच्या नावासंबंधीची प्रक्रिया पूर्ण केली. यासंदर्भातील ध्वनीफितही समोर आली आहे.