Nanded Vasmat market turmeric price Pudhari photo
नांदेड

Nanded Vasmat market turmeric price| वसमत बाजारात हळदीला २८ हजारांचा ऐतिहासिक भाव; विडुळसह उमरखेडच्या शेतकऱ्यांना दिलासा

वसमत बाजारात हळदीला २८ हजारांचा ऐतिहासिक भाव; विडुळसह उमरखेडच्या शेतकऱ्यांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

उमरखेड: हळदीच्या बाजारभावात झालेल्या विक्रमी वाढीमुळे उमरखेड तालुक्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला प्रति क्विंटल २८ हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाल्याने विडुळसह तालुक्यातील हळद उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, हा दर दर्जेदार हळदीच्या विशिष्ट लॉटला मिळाला असून, प्रत्यक्ष बाजारभाव हा मालाच्या गुणवत्तेनुसार बदलत आहे.

उमरखेड तालुक्यातील विडुळ हे गाव पारंपरिक हळद उत्पादनासाठी परिचित आहे. गेल्या अनेक दशकांपासून येथील शेतकरी हळदीचे पीक घेत असून, विडुळचा आदर्श घेत परिसरातील अन्य गावांमध्येही हळद लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. वसमत येथील बाजारपेठ जवळची आणि सोयीची असल्याने उमरखेड तालुक्यातील बहुतांश हळद उत्पादक आपला माल विक्रीसाठी तेथे नेतात.

२० ऑक्टोबर रोजी वसमत बाजार समितीतील लिलावात दर्जेदार हळदीच्या २० कट्ट्यांच्या एका लॉटला प्रति क्विंटल २८ हजार रुपयांचा भाव मिळाला. त्या दिवशी बाजारात सुमारे सात हजार कट्ट्यांची आवक झाली होती. इतर दर्जाच्या हळदीला २४ हजार आणि २१ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी हळदीचे दर २५ हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र, यंदा २८ हजारांचा टप्पा गाठल्याने हळद उत्पादकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

यंदाच्या हंगामात अपुरा पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे हळदीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्पादन घटल्यास बाजारातील आवक मर्यादित राहू शकते. दुसरीकडे, मागणी कायम राहिल्यास दरातील तेजी टिकून राहण्याची शक्यता आहे. व्यापारी पुष्पेंद्र आकरबोटे आणि दौलत हुंबाड यांनीही उत्पादन व पुरवठ्याच्या परिस्थितीचा बाजारभावावर परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तथापि, आगामी काळातील दर हे बाजारातील आवक, मागणी आणि हळदीच्या गुणवत्तेवर अवलंबून राहणार आहेत.

“विडुळ गावात अनेक दशकांपासून शेतकरी पारंपरिक पद्धतीने हळदीचे उत्पादन घेत आहेत. यंदा कमी पाऊस आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनाबाबत चिंता असतानाच वसमत बाजारपेठेत मिळालेला २८ हजार रुपयांचा भाव दिलासादायक आहे. उमरखेड तालुक्यात हळदीचे क्षेत्र वाढत असल्याने या दरवाढीचा पारंपरिक तसेच नव्या हळद उत्पादकांना फायदा होऊ शकतो. भविष्यातही चांगले दर टिकून राहिल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल,” अशी प्रतिक्रिया माजी जिल्हा परिषद सदस्य तथा विडुळ येथील हळद उत्पादक शेतकरी संदीप हिंगमीरे यांनी व्यक्त केली.

थेट बाजार समितीत माल आणण्याचे आवाहन

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी त्यांनी मध्यस्थांवर अवलंबून न राहता थेट बाजार समितीच्या मोंढ्यात माल विक्रीस आणावा, असे आवाहन वसमत बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे यांनी केले आहे. हळदीला मिळालेल्या विक्रमी भावामुळे उमरखेड तालुक्यातील उत्पादकांच्या अपेक्षा वाढल्या असल्या, तरी प्रत्यक्ष मिळणारा दर हा मालाचा दर्जा, बाजारातील आवक आणि खरेदीदारांची मागणी यावरच ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT