Gulmohar Tree Pudhari
नांदेड

Summer Blossom | रखरखत्या उन्हात लाल ज्वालेसारखा बहरला गुलमोहर; निसर्गात रंगांची मुक्त उधळण

वैशाखाच्या कडक उन्हाने परिसर तापून निघाला असतानाच निसर्ग मात्र रंगांची मुक्त उधळण करत असल्याचे मनोहारी चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे.

पुढारी वृत्तसेवा

प्रशांत भागवत

उमरखेड : वैशाखाच्या कडक उन्हाने परिसर तापून निघाला असतानाच निसर्ग मात्र रंगांची मुक्त उधळण करत असल्याचे मनोहारी चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे. रस्त्यांच्या कडेला, शाळा-कॉलेज परिसरात तसेच मोकळ्या जागांमध्ये उभे असलेले गुलमोहर वृक्ष सध्या पूर्ण बहरात आले असून, त्यांच्या लाल-केशरी फुलांनी वातावरणाला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे. रखरखत्या उन्हात धगधगत्या अग्निज्वालेप्रमाणे दिसणारा गुलमोहर प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे.

उन्हाळा म्हटला की कोरडी जमीन, झाडांची पानगळ आणि उष्णतेच्या झळा असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र अशा कठीण ऋतूतही गुलमोहर आपल्या बहरातून निसर्गात नवचैतन्य निर्माण करताना दिसतो. त्याच्या फांद्यांवर दाटलेली लाल, नारिंगी आणि पिवळसर छटांची फुले पाहताना एखाद्या चित्रकाराने रंगांची मुक्त उधळण केल्याचा भास होतो. काळसर आकाशाच्या पार्श्वभूमीवर खुललेली ही फुले पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल देत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

मराठी साहित्य, कविता आणि गीतांमध्येही गुलमोहराला विशेष स्थान लाभले आहे. प्रेम, विरह, आठवणी, तरुणाई आणि गावाकडच्या पायवाटांशी गुलमोहराचे नाते जोडले गेले आहे. अनेक कवींनी त्याच्या बहरात जीवनातील उत्कट भावनांचे प्रतिबिंब पाहिले आहे. त्यामुळे कवीच्या ओळी सहज आठवतात.

“रानामध्ये पेटल्या जणू लाल ज्वाला,
तसा फुलला गुलमोहर उन्हाच्या काळा...”

कवी प्रा. डॉ. अनिल काळबांडे यांनाही गुलमोहराच्या झाडाखाली झालेली पहिली भेट आजही आठवते. ते म्हणतात —

“गुलमोहराच्या झाडाखाली तिची नि माझी ओळख झाली,
कळलेच नाही कधी रे मजला, शतजन्मांची सोबत झाली.”

काही साहित्यिकांनी गुलमोहराला “उन्हात उमललेली सावली” अशी उपमाही दिली आहे. कारण उष्णतेच्या झळांमध्येही हा वृक्ष मनाला शांतता आणि डोळ्यांना दिलासा देणारा ठरतो.

शहरातील अनेक ठिकाणी सध्या गुलमोहराच्या झाडाखाली नागरिक फोटो काढताना, काही क्षण विसावताना दिसत आहेत. मोबाईलच्या युगातही निसर्गाशी नाते जोडण्याचे काम हा बहरलेला गुलमोहर करत आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात किंवा सायंकाळच्या मंद प्रकाशात त्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसत असल्याने निसर्गप्रेमींसाठी तो आकर्षणाचा विषय ठरत आहे.

पर्यावरणप्रेमींच्या मते, गुलमोहर हा केवळ शोभेचा वृक्ष नसून प्रतिकूल परिस्थितीतही सौंदर्य आणि सकारात्मकता जपण्याचा संदेश देतो. उन्हाच्या झळा सहन करत इतरांना सावली आणि आनंद देण्याची वृत्ती या वृक्षाकडून शिकण्यासारखी असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

सध्या शहरासह ग्रामीण भागातही गुलमोहराचा लालसर बहर निसर्गप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरत असून, उन्हाळ्याच्या तीव्रतेतही सौंदर्याची अनुभूती देणारा हा रंगोत्सव सर्वांचे मन मोहून टाकत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT