

सोलापूर : हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल म्हणजे वसंत ऋतुचे आगमन. निसर्गातील झाडी-झुडपी आपली पानगळ झाडून नवी पालवी फुटून नवचैतन्याची शिकवण देणारा उत्सव. वसंतोत्सवास बुधवार, दि.4 मार्चपासून प्रारंभ होत असून, वसंत ऋतूत फुललेली फुले, आलेला बहर म्हणजे आनंद ऊर्जा, आशावादाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते.
वसंत ऋतूला ऋतूंचा राजा म्हणून ओळखले जाते. वसंत ऋतूमध्ये झाडाला पालवी फुटते. वसंत उत्सव हा एक प्रकारचा निसर्ग उत्सव असून, या ऋतुत निसर्ग सोळा कलांनी फुलून उठतो. माणसांच्या जीवनातील तारुण्य म्हणजे निसर्गातील वसंत ऋतू हे तारुण्याचे प्रतीक आहे. पावसाळा, हिवाळ्यातील निसर्ग हा हिरवाईने नटलेला असतो. परंतु उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात वसंत ऋतूत नवी पालवी फुटून चैतन्य निर्माण करुन विविध रंगांच्या फुलांनी निसर्ग हे सजलेले असते.
वसंत ऋतुमध्ये निसर्ग बहराला येतो आणि म्हणूनच ऋतुराज म्हणून ओळखला जातो. कवी कालिदासापासून ते विदुषी दुर्गा भागवतांपर्यंत अनेकानेक कवी आणि लेखक या ऋतुराज वसंताचे वर्णन अशा काही अलौकिक शब्दांमध्ये करतात की, ते वाचकांनी मुळातूनच वाचायला हवे. निसर्ग ही एक देवता आहे. मागील 30 वर्षांत सिमेंटच्या इमारती मोठ्या प्रमाणात वाढल्या. शहरीकरणात निसर्ग जीवन हरवून गेले आहे. बहरलेली पाने, फुले याचा आंनद लुटायचे कसे, याचे विस्मरण अलिकडच्या पिढीत रुजत चालले आहे.