Two police officers suspended for acting as bystanders while murders were committed
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील सदा गैंग व साई लाला गँग मध्ये झालेल्या राड्यात तीन जण ठार झाले होते. यापैकी दोघांचा जागेवरच मृत्यू झाला होता, तर जखमीला उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी उपचार घेत असलेल्या गुंडाला बाहेर काढून चाकूने वार करुन खून केला होता. हा सर्व प्रकार सुरु असताना बाजूला असलेले पोलीस व मेस्को कंपनीचे सिक्युरीटी गार्ड मात्र, बघ्याची भुमिका घेतली होती. याचा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी कर्तव्यात कसूर करणा-या दोन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांनी निलंबित केले आहे. तसेच पोलीस निरीक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.
या बाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या दोन गँगमधील राड्यात सदा गँगच्या अरिजितसिंग गजाननसिंग चव्हाण याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गंभीर जखमी असलेल्या साईलाला गँगचा मोहम्मद अरबाज याचाही उपचारापुर्वी मृत्यू झाला होता. मात्र, साईलाला गँगचा आणखी एक सदस्य असलेला सय्यद आवेज सय्यद खलील हा गंभीर जखमी झाल्याने त्याला विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
त्यावेळी मृत अरिजितसिंगचा भाऊ प्रदिप चव्हाण याने रुग्णालयात जाऊन रागाच्या भरात सय्यद आवेजला अपघात कक्षातून बाहेर काढून चाकूने सपासप वार करुन ठार केले. या घटनेच्यावेळी सर्वसामान्य नागरिकांसह पोलीस आणि सिक्युरिटी गार्डही उपस्थित होते. त्यांनी हल्ला करणा-याला रोखले नाही. उलट या हल्याचा व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल झाल्याने पोलीसांना टिकेचा धनी व्हावे लागले.
दरम्यान, घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांनी घटनास्थळावर उपस्थित असलेले भाग्यनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आनंदराव कनिराम राठोड व नागेश गणपतराव वाडीयार दोघांना निलंबित केले.
तसेच भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना देखील निष्काळजीपणा केला म्हणून कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. तसेच विष्णूपुरी रुग्णालयातील मेस्को कंपनीचे सिक्युरिटी गार्डवर देखील कारवाई करण्याची शिफारस कंपनीकडे करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी प्रसिध्द केलेल्या पत्राद्वारे दिली आहे.