

नांदेड : शहरात गँगवॉरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली असून, या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारी वर्चस्वाच्या वादातून शहरातील ई-स्क्वेअर परिसर आणि त्यानंतर थेट शासकीय रुग्णालयात हल्लेखोरांनी हल्ले करुन खुन केला. ही संपुर्ण घटना शुक्रवारी दि.३ च्या रात्री घडली.
या बाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, शहरातील कॅनाल रस्त्यावर असलेल्या ई-स्क्वेअर परिसरात काही अज्ञात हल्लेखोरांनी पूर्ववैमनस्यातून अरिजीतसिंग गजानन चव्हाण याच्यावर अचानक हल्ला चढवला. अचानकपणे धारदार शस्त्रांनी केलेल्या या भीषण हल्ल्यात २५ वर्षीय अरिजीतसिंग याचा जागीच मृत्यू झाला. अरिजीतसिंग हा आपल्या दोन मित्रांसोबत सिनेमा पाहण्यासाठी आला असताना हल्लेखोरांनी नियोजनबध्द पध्दतीने त्याचा 'गेम 'केला. या हल्यात सय्यद आवेज सय्यद खलील, घनश्याम रेड्डी आणि मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख हे देखील गंभीर जखमी झाले. भररस्त्यात झालेल्या या खुनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
ई-स्क्वेअर परिसरातील हल्ल्यानंतर जखमी झालेल्या सय्यद आवेज आणि मोहम्मद अरबाज यांना पोलिसांनी तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, या घटनेचे पडसाद तिथेही उमटले. भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मृत अरिजीतसिंगचा भाऊ राजेश चव्हाण हा हातात चाकू घेऊन थेट शासकीय रुग्णालयात शिरला. त्याने अपघात विभागाजवळ उपचार घेत असलेल्या सय्यद आवेज (२७) आणि मोहम्मद अरबाज (२३) यांच्यावर सपासप वार केले. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी झालेल्या या हल्ल्यामुळे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ही घटना वर्चस्वाच्या संघर्षातून घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे यातील इतर साथीदारांना पकडण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. एकाच वेळी नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला करण्यात आल्याने हल्लेखोरांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुरावे गोळा केले आहेत. फॉरेन्सिक पथक आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू आहे. पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याचें निर्देश पोलिसांना दिले आहेत.