NEET' Paper Leak : 'नीट' पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत File Photo
नांदेड

NEET Paper Leak Case : 'नीट' पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत

५ लाखांत पेपर खरेदी, विद्युतनगर भागात पालकाची सीबीआय चौकशी

पुढारी वृत्तसेवा

Threads of the 'NEET' Paper Leak Lead to Nanded

संतोष जोशी

नांदेड : देशभरात खळबळ माजवून सोडणाऱ्या 'नीट' पेपरफुटीच्या गैरव्यवहाराचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत पोहोचले असून, शनिवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नांदेडातील विद्युतनगर भागात मोठी कारवाई केली. येथील रहिवासी कदम यांच्या फ्लॅटवर सीबीआयच्या विशेष पथकाने छापा टाकत तब्बल आठ तासांपेक्षा जास्त वेळ कसून चौकशी केली.

आपल्या मुलीसाठी तब्बल पाच लाख रुपयांत नीटचा पेपर खरेदी केल्याचा गंभीर आरोप या कुटुंबावर आहे. लातूर येथील एका नामांकित कोचिंग क्लासचालकाची शुक्रवारी कसून चौकशी केल्यानंतर, सीबीआयचे हे पथक थेट नांदेडात दाखल झाले. या कारवाईमुळे नांदेडमधील काही खासगी कोचिंग क्लासेस चालक आणि संशयास्पद विद्यार्थी आता सीबीआयच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

नांदेडातील विद्युतनगर भागात शनिवारी सकाळीच दाखल झालेल्या सीबीआय पथकाने घराचे दरवाजे बंद करून झाडाझडती सुरू केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण कारवाईदरम्यान सीबीआयचे पथक प्रामुख्याने खालील अनुत्तरित प्रश्नांचा माग काढत असून, त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत आहे, नांदेडमध्ये नीटची तयारी करत असताना संबंधित विद्यार्थिनीला कोचिंग क्लासेसच्या सराव परीक्षेत (मॉक टेस्ट) १०० ते १२० गुणांच्या वर कधीच मजल मारता आली नव्हती. मात्र, अंतिम परीक्षांच्या काळात तिचा स्कोअर थेट ५६० पर्यंत कसा पोहोचला ? हा चमत्कार की सुनियोजित कट? याचा तपास सीबीआय करत आहे.

कदम कुटुंबीयांची उद्या पुन्हा चौकशी

सीबीआयच्या पथकाने नांदेड मध्ये विद्युतनगर भागातील कदम यांच्या कुटुंबीयांची ८ तासं चौकशी केल्यानंतर विद्यार्थिनी व पालकांना मंगळवारी पुणे येथे पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे कदम कुटुंबीय पुण्यासाठी रवाना झाले आहेत. मंगळवारी ते सीबीआयच्या पथकासमोर हजर राहणार असल्याची माहिती प्राप्त झाली असून, सीबीआयचे अधिकारी नीट प्रकरणातील ताब्यात घेते-लेल्या व इतर संशयिताची पुण्यात चौकशी करणार आहेत अशी माहिती ही सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

कोचिंग क्लासेस, अन्य विद्यार्थी रडारवर ?

लातूर, पुणे व्हाया नांदेड अशा या पेपरफुटीच्या जाळ्यात नांदेडमधील आणखी काही खासगी कोचिंग क्लासेसचे चालक किंवा एजंट सक्रिय आहेत का? तसेच अचानक मोठी गुणांची उडी घेतलेले इतर संशयास्पद विद्यार्थी कोण आहेत, याचा डेटा सीबीआय गोळा करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून ९ जणांना ताब्यात घेतले आहे. लातूरमधील कोचिंग क्लास चालकांच्या चौकशीतून नांदेडमधील या कदम कनेक्शनचा सुगावा लागला होता. शनिवारी झालेल्या ८ तासांच्या चौकशीत सीबीआयच्या हाती काही महत्त्वपूर्ण तांत्रिक पुरावे आणि दस्तऐवज लागल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT