The municipal corporation takes action against defaulters; two shops seized by the team
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता कर वसुलीसाठी जप्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सोमवारी (दि. ०२) फेब्रुवारी पासून ही मोहिम शहरभर व्यापक स्वरूपात राबविण्यास सुरुवात करण्यात आली.
पथकाने दोन थकबाकीदारांचे दुकाने सील करून जप्तीची कारवाई करत मोहिमेचा शुभारंभकेला आहे. चालू वर्षात पालिकेसाठी मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट १५१ कोटी रुपये ठेवण्यात आले आहे; परंतु जानेव ारी अखेर केवळ ४३ कोटी रुपयांचीच वसुली झाली आहे.
महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी वसुलीसाठी विशेष वसुली व जप्ती पथकांची स्थापना केली आहे. अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व अतिरिक्त आयुक्त नीलेश सुकेवार यांना प्रत्येकी तीन-तीन क्षेत्रिय कार्यालयाचे नियंत्रण अधिकारी म्हणून देण्यात आले आहे. झोननिहाय स्थापित करण्यात आलेल्या पथकांमध्ये प्रत्येकी ८ ते ९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
मालमत्ताधारकांनी थकीत कराचा भरणा न केल्यासत्यांची स्थावर व जंगम मालमत्तांची जप्ती, नळ व ड्रेनेज कनेक्शन खंडित करून पथकातील कर्मचाऱ्यांनी संबंधित क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून सार्वजनिक सुट्ट्याच्या दिवशीसुध्दा वसुली काम करण्याचे आदेश आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी दिले आहेत, त्याचप्रमाणे दैनंदिन केलेल्या कामाचा अहवाल महसूल विभागाचे उपआयुक्त स. अजितपालसिंघ संधू यांच्याकडे सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
दोन दुकाने सील
शहरातील निवासी व बिगरनिवासी थकबाकीदारांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. क्षेत्रिय कार्यालय क्र. ०२ अशोकनगर अंतर्गत क्षेत्रिय अधिकारी राजेश जाधव व त्यांच्या पथकाने हनुमानगड भागातील सरोजा नागनाथ सुन्नेवार, विमल नागनाथ सुन्नेवार मालमत्ता या दोन मालमत्ताधारकांकडून मालमत्ता करापोटी एक लाख सहा हजार एवढी थकबाकी असल्याने नोटीस देऊनसुध्दा कर भरण्यास टाळाटाळ होत असल्याने संबंधित मालमत्ता धारकांची दोन व्यावसायिक दुकाने सील करण्यात आली आहेत.