The issue of families living on Waqf Board land is on the agenda.
धर्माबाद, पुढारी वृत्तसेवा : शहरातील मौलाली नगर, रसिक नगर, इंदिरा नगर, यशवंत शाळा परिसर तसेच फुलेनगर या भागांमध्ये वक्फ बोर्डच्या जागेवर अनेक दशकांपासून वास्तव्यास असलेल्या ३०० ते ४०० कुटुंबांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
त्यामुळे कायमस्वरूपी भाडेकरार पत्र करा, अशी मागणी बाजार समितीचे माजी उपसभापती व कंत्राटदार मोईजोद्दीन करखेलीकर (बिडीवाले), ताहेर पठाण यांनी अल्पसंख्याक, औकाफ व वक्फ बोर्ड विभागाचे कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे यांची विशेष भेट घेऊन केली आहे.
शहरातील विविध वस्त्यांतील गोरगरीब कुटुंबांची परिस्थिती, त्यांचे स्थलांतरित होण्याचे वाढते धोके आणि कायदेशीर संरक्षणाची आवश्यकता याबाबत त्यांनी मंत्र्यांसमोर व्यथा मांडली. वक्फ बोर्डाच्या जागेवर ही कुटुंबे अनेक वर्षांपासून या जागांवर कायदेशीर व सामाजिकदृष्ट्या स्थिर जीवन जगत आहेत. त्यांना अचानक बेघर होण्याचा धोका कायम आहे.
म्हणूनच सरकारने या कुटुंबांना कायमस्वरूपी भाडेकरार पत्र देऊन त्यांच्या भविष्याला सुरक्षित करावे, या मागणीचे निवेदन कोकाटे यांना देण्यात आले. त्यावर कोकाटे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे माजी उपसभापती व कंत्राटदार मोईजोद्दीन करखेलीकर यांनी सांगितले.