

I will give the candidate who listens to me, vote on my guarantee
नवीन नांदेड, पुढारी वृत्तसेवा : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी धनेगावातून माझं ऐकणाराच उमेदवार देईल, त्या उमेदवाराला माझ्या गॅरंटीवर मतदान करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांनी केले. धनेगाव येथील मनोहर पाटील शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचे मंगळवारी (दि.४) उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला माजी आमदार महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, उपाध्यक्ष संजय घोगरे, विधानसभा अध्यक्ष सचिन उमरेकर, तालुकाध्यक्ष विशंभर शिंदे, महानगर उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख, ओबीसी आघाडीचे महानगराध्यक्ष संजय इंगेवाड, माजी नगरसेवक उदय देशमुख, सतीश बसवदे, सरपंच पिंटू पाटील शिंदे यांच्यासह आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. अशोकराव चव्हाण म्हणाले की, माजी केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण हे धनेगावच्या मतदान केंद्रावर येऊन मतदान करत असत. हे माझे गाव आहे. या भागातल्या लोकांशी चव्हाण कुटुंबीयांचे एक वेगळे नाते आहे. एक आत्मीयतेचा सबंध आहे. या सगळ्या आठवणी माझ्या मनात कायम आहेत. कै. शंकरराव चव्हाण यांचे या भागातील लोकांशी असलेले सबंध, त्यांच्या बद्दलच्या भावना, आमचे कुटुंब कधीही विसरू शकत नाही.
धनेगावला येऊन प्रचार करावा अशातला भाग नाही. जिकडे 'अशोक चव्हाण तिकडे धनेगाव' असा आत्मविश्वास माझ्या मनात आहे. आज धनेगावचा कुणीही आला तर मी त्याला कधी नाही म्हणालो नाही, असे खा. अशोकराव चव्हाण म्हणाले. निवडणूक म्हणजे दिवाळी, तुमची दिवाळी सुरु झाल्याने मतदार खूप खूश दिसत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
मोदींच्या नेतृत्वात आपल्याला २०४७ पर्यंत विकसित भारत करायचा आहे, यात नांदेडचे नाव सर्वात वर राहिले पाहिजे. वंदे भारत सुरु झाली. आता बुलेट ट्रेन सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जे चांगलं होतंय त्याला चांगलं म्हणलं पाहिजे, जोपर्यंत अशोक चव्हाण आहे, तुम्ही चिंता करायची गरज नाही. आम्ही खोटे बोलणारे माणसं नाही. अशी हमी यावेळी खा. अशोकराव चव्हाण यांनी यावेळी उपस्थितांना दिली.
ते योग्य मार्गावर
संजय घोगरे धडाडीचा कार्यकर्ता आहे. ते इतके दिवस चुकीच्या राजकीय मार्गावर होते. आता ते योग्य मार्गावर आले आहेत. त्यांचे पुढील राजकीय करिअर करू, असे खा. अशोकराव चव्हाण म्हणाले.