The first emergency operations center in the state is in Nanded
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पूर्वीच्या बचत भवनात अद्ययावत जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र स्थापन होत आहे. त्यासाठीची संपूर्ण सज्जता झाली आहे. संगणक आदी काही किरकोळ वस्तू उपलब्ध झाल्यानंतर हे केंद्र लोकसेवेत रुजू होण्यास सज्ज आहे.
दुष्काळ, चक्रीवादळ, मुसळधार पाऊस, पूर, आग, भूकंप, गारपीट, ढग फुटणे, बोट उलटणे, उष्णतेची लाट, मोठे अपघात, आदी आपत्तींमुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असणे आणि मदत उपाययोजनची व्यवस्था करमे, बचाव आणि मदत कार्याचे पर्यवेक्षण करणे आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून देणे, प्रसंगी राज्य आपत्ती सुरक्षा पथक तसेच राष्ट्रीय आपत्ती सुरक्षा पथकाशी संपर्क साधून संकटग्रस्तांना त्यांची मदत उपलब्ध करून देणे, देशांतर्गत व परदेशात नैसर्गिक आपत्तीमुळे अडकलेले पर्यटक यांच्याशी संपर्क साधून त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देत स्थानिक नातेवाईकांना धीर देणे, आदी विविध प्रकारची कामे या जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राच्या माध्यमातून चालतात.
नांदेडसारख्या जिल्ह्यात गोदावरी, पैनगंगा, आसना, मांजरा, मानार, कयाधू यासारख्या मोठ्या व मध्यम नद्या वाहतात. पावसाळ्यात अनेकवेळा या नद्यांना पूर आल्याने जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचा इतिहास आहे. सद्यस्थितीत जिल्हा या परिस्थितीला तोंड देत आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात दोनवेळा लष्कर तसेच राज्य आपत्ती बचाव पथकाला पाचारण करून त्यांची मदत घ्यावी लागली.
अशा वेळी समन्वयासाठी नदिड जिल्हाधिकारी कार्यालयात एका छोटेखानी कक्षात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्र कार्यरत आहे. परंतु राज्य शासनाने आता या विभागाचे नाव बदलून जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र असे नाव दिले आहे. राज्यभरात महत्त्वाच्या ठिकाणी अशी केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत.
दरम्यान, राज्यातील पहिले केंद्र नांदेड येथे स्थापन होईल, अशी चिन्हे आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील पूर्वीच्या बचत भवनात आवश्यक ते बांधकाम पूर्ण झाले आहे. या केंद्रात एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कक्ष, ४५ जणांचे प्रशिक्षण केंद्र, छोटेखानी बैठक कक्ष, अत्याधुनिक दृकश्राव्य प्रणाली, वायरलेस यंत्रणा तसेच हॉटलाईन आदी सुविधा असतील. सर्व यंत्रणा संगणकीकृत असून येत्या काळात ए.आय.चा सुद्धा प्रभावी वापर केला जाणार असल्याची माहिती आहे. सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून हे केंद्र सज्ज करण्यात येत आहे. काही तांत्रिक बाबी वगळता संपूर्ण सिद्धता झाली असून लवकरच हे केंद्र लोकसेवेत रुजू होईल, असे सांगण्यात आले.
साहित्य सज्जता पुरेशी
नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी आणि आपद्वस्तांना दिलासा देण्यासाठी आवश्यक सर्व बचाव साहित्य उपलब्ध असून दीडशेच्या वर लाईटबॉय, (रबरी गोलरिंग) तसेच लाईट जॅकेट प्रत्येक तालुक्याला प्रत्येकी २० ते २५ या प्रमाणात पुरवण्यात आले आहेत. वुड कटर (स्वयंचलित लाकूड करवत), बॅटऱ्या आदी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. १० ते १२ आसन क्षमतेच्या १६ रबरी बोटी उपलब्ध आहेत. त्या विविध विभागाकडे व काही तालुका यंत्रणेकडे सोपविण्यात आल्याची माहिती आहे.