बाबाराव कंधारे
Mahur Revanayak Pardi school issue
वाई बाजार : माहूर तालुक्यातील शिक्षण विभागाला वालीच उरला नसल्याचे वास्तव समोर येत असून रेवानाईक पार्डी येथील जि.प. शाळेतील नियमित शिक्षिका दीर्घ रजेवर गेल्याने विद्यार्थांना बंद शाळेच्या आवारातच दिवस काढावा लागत आहे. यामुळे माहूर शिक्षण विभागाच्या उदासिन धोरण चव्हाट्यावर आले आहे.
माहूर तालुक्यातील मौजे रेवानाईक पार्डी (बंजारा तांडा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज (दि. २३) हा प्रकार उघड झाला आहे. येथील नियमित शिक्षिका १७ जूनपासून दीर्घ रजेवर गेल्याचे प्रभारी केंद्रीय मुख्याध्यापकाकडून सांगण्यात आले आहे. तर नियमित शिक्षिका रजेवर जाऊन तब्बल सहा दिवस झाले असले तरीही तेथे पर्यायी शिक्षकच उपलब्ध झाला नसल्याने विद्यार्थ्यांना चक्क बंद असलेल्या शाळेत दिवस काढावा लागल्याचे वास्तव समोर आले आहे.
दरम्यान, शाळेतील सर्व विद्यार्थी बंद शाळेच्या व्हरांड्यात बाहेर बसून गुरूजींची वाट पाहत असताना येथे शिक्षक पाठविण्याची जबाबदारी नेमकी कुणाची..? याबाबत केंद्रीय मुख्याध्यापक ते माहूरचे गटशिक्षणाधिकारी कार्यालय आपले हात झटकत असून एकमेकांकडे बोट दाखवून आपापली जबाबदारी झटकण्यात मश्गुल आहेत.
विशेष म्हणजे माहूरचे गटशिक्षणाधिकारी पद रिक्त असल्याने सद्यस्थितीत येथे कुणीही जबाबदार गटशिक्षणाधिकारी नाही. त्यामुळे हे पद केवळ तोंडी आदेशाने एका शिक्षण विस्तार अधिका-याकडे असल्याचे समजते. तर रेवानाईक पार्डी जि.प. शाळेतील नियमित शिक्षिका दीर्घ रजेवर गेल्यानंतर केंद्र असलेल्या वाई बाजार शाळेतून केंद्रीय शाळा या नात्याने चार दिवस पर्यायी शिक्षक पाठवून सोपस्कार पार पाडला.
परंतु, चार दिवसानंतर आज येथील शाळेवर शिक्षक पाठवण्याची जबाबदारी नेमकी कुणाची या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक झाले. उद्या दि. २४ रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला ग्रामस्थांकडून धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे. माहूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था दयनीय झाल्याचे दिसून येत आहे. सक्तीच्या शिक्षण कायद्याची प्रत्यक्षात हिच अवस्था का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.