Nanded Political News : 'राष्ट्रवादी'च्या सभेत अंतुले यांचे गुणगान ! File Photo
नांदेड

Nanded Political News : 'राष्ट्रवादी'च्या सभेत अंतुले यांचे गुणगान !

भोकरमध्ये परिवर्तन घडविण्याचे तटकरे यांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Tatkare's appeal to bring about change in Bhokar

विशेष प्रतिनिधी

नांदेड : भोकर नगर परिषदेच्या निवडणुकीनिमित्त भाजपाने जारी केलेल्या वचननाम्यावर या पक्षाच्या विद्यमान प्रमुख नेत्यांसोबत काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे छायाचित्र छापल्याचे समोर आल्यानंतर वरील निवडणुकीत भाजपा नेते खा. अशोक चव्हाण यांना आव्हान देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी भोकरच्या भूमीत नव्या पिढीच्या विस्मृतीत गेलेले काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री बॅ. अब्दुल रहेमान अंतुले यांचे गुणगान केले आहे.

वरील निवडणुकीत शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी घेतलेली जाहीर सभा अशोक चव्हाणांवरील त्यांच्या वक्तव्यामुळे चांगलीच गाजली. त्यानंतर भाजपाच्या जाहीरनाम्यावर शंकररावांचे छायाचित्र असल्याचे बघायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंगळवारी खा. सुनील तटकरे, माजी मंत्री नवाव मलिक यांच्यासह अन्य नेत्यांची जाहीरसभा भोकरमध्ये भरवली. भोकरमधील मुस्लीम समुदायाचे मतदान निवडणुकीमध्ये निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर ४५ वर्षांपूर्वी मुख्यमंत्री राहिलेल्या ए. आर. अंतुले यांचा गौरवपूर्ण उल्लेख करत तटकरे यांनी वरील समुदायास आपल्या पक्षाच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेस पक्षाने अल्पसंख्याक समाजातील अंतुले यांना मुख्यमंत्री केले होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात संजय गांधी निराधार आणि इतर योजना सुरू केल्या. राज्यातील पहिली कर्जमाफी त्यांच्याच काळात झाली, याकडे तटकरे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. भोकर मतदारसंघाला दीर्घकाळ राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पण दुर्दैवाने या भागाचा विकास झाला नाही, असे नमूद करून त्यांनी चव्हाण पिता-पुत्रावर अप्रत्यक्ष टीकाही केली.

आमचा पक्ष काँग्रेस, महाविकास आघाडी यांच्यासोबत सत्तेमध्ये होता. आता आम्ही एनडीएसोबत असलो, तरी आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष विचारांचा तसेच फुले-शाहू-आंबेडकरांच्या सामाजिक समतेला मानणारा असल्याचे स्पष्ट करून अल्पसंख्याकांच्या उन्नतीसाठी आमच्या पक्षाने मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळास १ हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याचे तटकरे यांनी नमूद केले. लाडकी बहीण ही क्रांतिकारी योजना आमचे पक्षाध्यक्ष अजित पवार यांचीच असल्याचा दावा त्यांनी केला.

या सभेस माजी मंत्री नवाब मलिक यांच्यासह राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, आ. प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवराज होटाळकर, बाळासाहेब रावणगावकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नागनाथ घिसेवाड तसेच नगरसेवक पदाच्या इतर उमेदवारांना विजयी करून भोकरमध्ये परिवर्तन घडवा, असे आवाहन या सभेमध्ये सर्वच वक्त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT