BJP Faces Nepotism Charges:
भाजप देशभर घराणेशाहीला विरोध करत आपली ताकद वाढवत असताना, नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने मात्र चक्क एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली आहे. भाजपला नांदेडमधील महत्वाच्या लोहा शहरात दुसरे उमेदवारच मिळाले नाहीत का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
लोहा शहरातील माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी हे भाजपकडून यंदाही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. त्याच्या कुटुंबात तब्बल पाच नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत.
नगराध्यक्षपदाचे उमेदवार: गजानन सूर्यवंशी (माजी नगराध्यक्ष)
नगरसेवकपदाचे उमेदवार:
पत्नी: गोदावरी सूर्यवंशी
भाऊ: सचिन सूर्यवंशी
भावाची पत्नी: सुप्रिया सचिन सूर्यवंशी
मेहुणा: युवराज वाघमारे
भाच्याची पत्नी: रीना अमोल व्यवहारे
एकाच कुटुंबातील सहा सदस्यांना उमेदवारी दिल्याने भाजपच्या धोरणांवर स्थानिक पातळीवर प्रचंड टीका होत आहे. भाजपला निवडणुकीत सक्षम उमेदवार मिळत नव्हते, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला का, अशी चर्चा लोहा शहरात रंगली आहे.
यापूर्वी लोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची सत्ता होती. या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपने घराणेशाहीला बळ दिले असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
एकंदरीत, घराणेशाहीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या पक्षानेच एका निवडणुकीत एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिल्यामुळे नांदेड जिल्ह्याचे लोह्याचे शहर सध्या चर्चेचे केंद्र बनले आहे.